Jammu Kashmir Crime News : कथित भ्रष्टाचारप्रकरणी जम्मू-काश्मीरमधील एका पोलीस उपनिरीक्षकाला अटक करण्यासाठी गुन्हे अन्वेशन विभागाने (सीबीआय) जाळं टाकलं होतं. मात्र, हा पोलीस सीबीआयच्या पथकाला गुंगारा देऊन फरार होण्यात यशस्वी ठरला आहे. जम्मू जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या वृत्ताची पुष्टी केली आहे. ते म्हणाले, “सीबीआयने पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद बशीर मलिक यांना पकडण्यासाठी पूर्ण योजना आखली होती. पण, तो सीबीआयच्या पथकाच्या हातावर तुरी देऊन पसार झाला आहे. केवळ सीबीआयच नव्हे तर आम्ही देखील त्याचा शोध घेत आहोत.”
मोहम्मद बशीर मलिक यांनी घराना गावचे माजी सरपंच गुरदयाल सिंह यांना त्यांची पत्नी पूजा देवी यांच्या मृत्यूनंतर हत्येच्या संशयाखाली अटक केली होती. मात्र, शवविच्छेदन अहवाल व एफएसएल अहवालानुसार पूजा देवी यांच्या शरीरावर कोणत्याही प्रकारची जखम नव्हती, तसेच त्यांना विष दिल्याचा दावा देखील खोटा होता. यावरून गुरदयाल यांच्या कुटुंबाने मोहम्मद बशीर यांच्यावरआरोप केला की केवळ पैसे उकळण्यासाठी व गुरदयाल यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठीच मोहम्मद बशीर यांनी गुरदयाल यांना अटक केली होती.
नेमकं प्रकरण काय?
पोलिसांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितलं की एक महिना पोलिसांच्या पथकाने तपास केल्यानंतर त्यांना मोहम्मद बशीर यांना अटक करण्यात यश मिळालं होतं. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेतील अनेक कलमांतर्गत गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी १५ दिवस पोलीस कोठडीत व दोन दिवस न्यायालयीन कोठडीत घालवल्यानंतर त्यांना जामीनावर घरी पाठवण्यात आलं होतं.
दरम्यान, सूत्रांच्या हवाल्याने इंडियन एक्सप्रेसने यासंबंधी दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे की २८ एप्रिल रोजी पूजा देवी यांची प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांचे पती गुरदयाल सिंह यांनी त्यांना आरएस पुरा रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र उपचारांदरम्यान पूजा देवी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पूजा देवी यांच्या चुलत भावाने पूजा देवी यांच्या सासरकडील मंडळींवर पूजा यांना विष देऊन मारल्याचा आरोप केला. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक मलिक हे या प्रकरणाचा तपास करत होते.
खटला बंद करण्यासाठी गुरदयाल यांच्याकडून पैशांची मागणी
मलिक यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला. ही हत्या नसल्याचं त्यातून निष्पन्न झालं. तरी देखील मलिक यांनी गुरदयाल सिंह व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर काही दिवसांनी पूजा देवी यांच्या वडिलांनी गुरदयाल सिंह यांना आर. एस. पुरा येथील त्यांच्या एका मित्राच्या घरी हे प्रकरण मिटवण्यासाठी बोलावलं. मात्र, मलिक यांनी तिथेच गुरदयाल सिंह यांना अटक केली. त्यानंतर मलिक यांनी हे प्रकरण बंद करण्यासाठी गुरदयाल यांच्या कुटुंबाकडून पैसे मागण्यास सुरुवात केली.
मलिक यांनी पैसे उकळण्यासाठी हा सगळा खटाटोप केल्याचं समजताच गुरदयाल सिंह यांच्या कुटुंबीयांनी सीबीआयकडे तक्रार केली. तत्पूर्वी सिंह कुटुंबाने मलिक यांना रोख ५० हजार रुपये दिले होते. सीबीआय मलिक यांना पकडण्यासाठी त्यांच्या पोलीस ठाण्यात गेले तेव्हा अचानक तिथली वीज बंद झाली. तेवढ्याच मलिक पैसे घेऊन पोलीस ठाण्यातून पसार झाले. तेव्हापासून सीबीआय मलिक यांचा शोध घेत आहेत.