करोनाचा नवा ओमिक्रॉन विषाणूने (Corona Omicron variant) जगभरात काळजीचं वातावरण निर्माण केलंय. हा विषाणू करोनाच्या डेल्टा विषाणूपेक्षा अनेक पटींनी धोकादायक असल्याचंही तज्ज्ञ सांगत आहे. मात्र, अद्यापही या विषाणूबाबत पुरेशी माहिती समोर आलेली नाही. या विषाणूच्या संरचनेत अनेक बदल झाल्यानं हा अधिक संसर्गजन्य आणि धोकादायक झाल्याचं निरिक्षण संशोधक व्यक्त करत आहेत. मात्र, या विषाणूचं बदललेलं रुप नेमकं कसं आहे? हे अद्याप समोर आलं नव्हतं. आता रोममधील विख्यात बांबिनो गेसू रुग्णालयाने ओमिक्रॉनचा पहिला फोटो जारी केला आहे.

या रुग्णालयाने त्रिमितीय (थ्री डायमेंशनल) फोटो जारी केलाय. हा ओमिक्रॉनचा फोटो एखाद्या नकाशासारखा (मॅप) दिसतो आहे. यात ओमिक्रॉन विषाणूच्या रचनेत डेल्टाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. यात सर्वात महत्त्वाचे बदल प्रोटिनवर झाले आहेत. हेच प्रोटिन करोना विषाणूला मानवी शरिरात प्रवेश करण्यास मदत करतात, अशी माहिती या रुग्णालयातील संशोधकांच्या पथकाने दिलीय.

असं असलं तरी या संशोधकांच्या पथकानेही हेही स्पष्ट केलंय की ओमिक्रॉनच्या विषाणूत झालेले सर्व बदल हे धोकादायकच आहेत असंही लगेच सांगता येणार नाही. करोनाचा हा विषाणू मानवी शरीराशी जुळवून घेत रुप बदलत आहे इतकंच संध्या म्हणता येईल, असंही त्यांनी नमूद केलं. यापुढील संशोधन विषाणूमधील हे बदल निकामी, कमी धोकादायक की अधिक धोकादायक आहेत याबाबत स्पष्टता देतील, असं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा : ओमिक्रोन व्हेरिएंटशी संबंधित पंतप्रधानांच्या आढावा बैठकीत दक्षिण आफ्रिका विमान सेवेबद्द्ल झाला ‘हा’ निर्णय…

याशिवाय करोना लसीनंतर या विषाणूंच्या रचनेत बदल झालाय का याचाही शोध घेतला जाईल. त्यानंतरच ओमिक्रॉनमध्ये झालेल्या बदलांची संसर्गातील भूमिका समजू शकेल, अशी माहिती संशोधकांनी दिलीय.

ओमिक्रॉन विषाणूचा नवा फोटो कसा तयार केला?

बोसवाना, दक्षिण आफ्रिका आणि हाँगकाँगमध्ये आढळलेल्या ओमिक्रॉन विषाणूंवर संशोधन करून शास्त्रज्ञांनी त्यांच्या संरचनेची एका विशिष्ट क्रमाने मांडणी केली. वैज्ञानिकांना उपलब्ध या सर्व माहितीचा वापर करून ओमिक्रॉनच्या बदलांचा विचार करत हा फोटो तयार करण्यात आला आहे. तुलनात्मक अभ्यासासाठी ओमिक्रॉनच्या फोटोसोबत डेल्टा विषाणूचाही फोटो देण्यात आला आहे.