Garib Rath Express Fire VIDEO : पंजाबमधील अमृतसरहून बिहारमधील सहरसा येथे जाणाऱ्या गरीबरथ एक्सप्रेसमध्ये शनिवारी पहाटे मोठी दुर्घटना घडली. या ट्रेनचे तीन डबे जळून खाक झाले आहे. शनिवारी (१८ ऑक्टोबर) सकाळी पंजाबमधील सरहिंद रेल्वेस्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर अंबाला स्टेशनच्या एक किलोमीटर मागे असताना ही दुर्घटना घडली.

ट्रेनच्या एका डब्यातून धूर निघत असल्याचं पाहून ट्रेन थांबवण्यात आली. ही आग ट्रेनच्या तीन डब्यांमध्ये पसरली. ट्रेन थांबताच प्रवासी बाहेर धावले. या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. सर्व प्रवासी सुखरुप असल्याचं सांगण्यात आलं आहे.

आगीचं कारण काय?

सरहिंद जीआरपी एसएचओ रतन लाल यांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं की ट्रेनच्या एका डब्यातून धुराचे लोळ बाहेर पडत असल्याचं पाहिलं. त्यानंतर ताबडतोब ट्रेन थांबवण्यात आली. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. ट्रेन थांबताच प्रवासी लगबगीने ट्रेनमधून उतरले. या आगीमुळे ट्रेनचे तीन डबे जळून खाक झाले आहेत. मात्र, आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आम्ही आग लागण्यामागचं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. लवकरच यासंबंधीचं निवेदन जारी केलं जाईल. त्याद्वारे आगीचं कारणही स्पष्ट केलं जाईल.

या घटनेची माहिती देताना रेल्वे मंत्रालयाने म्हटलं आहे की पंजाबमधील सरहिंद स्टेशनजवळ आज सकाळी १२२०४ अमृतसह सहरसा गरीब रथ एक्सप्रेसच्या एका डब्याला आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग विझवण्यात आली आहे.

दुर्घटनेत एक महिला प्रवासी जखमी

गरीबरथ एक्सप्रेस पहाटे अमृतसरवरून सुटली. त्यानंतर सरहिंद रेल्वे स्टेशनजवळ धावत्या ट्रेनच्या एका एसी बोगीमध्ये आग लागली. त्यानंतर तातडीने ट्रेन थांबवण्यात आली. ट्रेन थांबताच प्रवाशांनी पटापट ट्रेनमधून उड्या मारल्या. दरम्यान ही आग पसरली आणि आणि दोन डब्यांनी पेट घेतला. काही स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटलं आहे की या घटनेत एक महिला जखमी झाली आहे. या महिलेला जवळच्याच शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार चालू आहेत.