गिलानीचा भाऊ बिस्मिल्लाह याचा सवाल

जेएनयू विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या विरोधात निदर्शने करण्यात आमच्यासह अनेक जण सहभागी झाले, मात्र ज्या एसएआर गिलानीविरुद्ध देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला आहे त्याच्या पाठीशी जेएनयू उभे राहणार का, असा सवाल गिलानीचा भाऊ बिस्मिल्लाह याने केला आहे.

जेएनयू विद्यार्थ्यांचा नेता कन्हैयाकुमार याला अटक करण्यात आल्यानंतर तीन दिवसांनी म्हणजेच १५ फेब्रुवारी रोजी पहाटे गिलानी याला अटक करण्यात आली. विद्यापीठाच्या संकुलात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाबद्दल जेएनयूच्या सहा विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला. तोच आरोप गिलानी याच्यावर प्रेस क्लबमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासंदर्भात ठेवण्यात आला आहे.

तथापि, कन्हैयाकुमारच्या सुटकेसाठी विद्यार्थी, शिक्षणतज्ज्ञ आणि अन्य पुढे सरसावले, मात्र गिलानी याला जेएनयूने वेगळी वागणूक दिली, असे गिलानी याच्या कुटुंबीयांचे मत आहे. कार्यक्रम तोच होता, आरोपही तेच आहेत. कन्हैया याच्याविरोधात पुरावे असल्याचा दावा पोलीस करीत आहेत, मात्र गिलानीविरोधात पुरावे असल्याचा दावा पोलिसांनी अद्याप केलेला नाही. असे असताना त्याच्याबद्दल जनता शांत का, त्याला वेगळी वागणूक का, असे सवाल बिस्मिल्लाह याने केले आहेत.गिलानीविरोधात पुरावे असल्याचा दावा पोलिसांनी अद्याप केलेला नाही.

कन्हैयाकुमारच्या सुटकेसाठी जोरदार प्रचार करण्यात आला. आता उमर खलिद आणि अनिर्बन यांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले जात आहेत, मात्र गिलानीबद्दल कोणीच बोलत नाही, असेही बिस्मिल्लाह म्हणाला.

गिलानी दिल्ली विद्यापीठात अनेक वर्षे शिकवीत आहे, मात्र त्याला अटक करण्यात आल्यापासून महाविद्यालयातील कोणताही अधिकारी एकदाही आमच्याकडे आलेला नाही. त्याला २००१ मध्ये अटक करण्यात आली तेव्हापासून तोच संसदेवरील हल्ल्याचा सूत्रधार असल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे, असेही तो म्हणाला.