Goa Health Minister Vishwajit Rane apologised to Doctor : गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी एका वरिष्ठ डॉक्टरांचं तडकाफडकी निलंबन केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओची गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चा होताना दिसते आहे. यानंतर आता राणे यांनी सोमवारी याबद्दल जाहीर माफी मागितली आहे. उद्देश चांगला होता पण शब्द चुकीचे होते असे राणे म्हणाले आहेत.

गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे (जीएमसीएच) मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांच्यावर राणे ओरडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर वैद्यकीय क्षेत्रातून आणि विरोधी पक्षांकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्यानंतर राणे यांनी डॉक्टरांची माफी मागितली आहे.

“मी मान्य करतो की मी ज्या पद्धतीने व्यक्त झालो ते योग्य नव्हते. मी त्यांना फोन करून त्यांच्याशी स्वतंत्रपणे बोलू शकलो असतो. मी जर त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर पुन्हा डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबियांची माफी मागतो,” असे राणे इंडिया टुडे टीव्हीशी बोलताना म्हणाले.

“मी इंडियन मेडिकल असोसिएशन आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी यांचीही माफी मागू इच्छितो. मी रुग्णांच्या वेदना समजू शकते आणि मी फक्त त्यांच्यासाठी उभा राहिलो. माझी आई देखील कॅन्सरची रुग्ण आहे, त्यामुळे त्यांना काय सहन करावे लागते हे मला माहिती आहे. मला यामध्ये राजकारण करायचे नाही,” असेही मंत्री राणे म्हणाले.

राणे यांनी जीएमसीएचमध्ये शनिवारी (७ जून) अचानक पाहणी केली आणि डॉ. कुट्टीवार यांच्यावर रुग्णांशी उद्धटपणे वागल्याचा आरोप केला आणि तात्काळ सस्पेंड ऑर्डर काढण्याचे आदेश दिले.

राणे काय म्हणाले होते?

यावेळी बोलताना आरोग्यमंत्री संबंधित वरिष्ठ डॉक्टरांना म्हणाले की, “रुग्णांशी कसं वागायचं हे शिकून घ्या. तुमच्या जिभेवर नियंत्रण ठेवायला शिका. तुम्ही डॉक्टर आहात ना? कितीही भार असला तरी तुम्हाला रुग्णांबरोबर गैरवर्तन करता येणार नाही”, असं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं. तसेच डॉक्टरांना उद्देशून असंही म्हटलं की, “त्यांच्या जागी दुसऱ्या सीएमओची नियुक्ती करा. मी त्यांच्या निलंबनाच्या फाईलवर सही करेन. मला त्यांना ताबडतोब निलंबित करायचं आहे. मी सहसा उद्धटपणे वागत नाही, पण मी हे आता सहन करू शकत नाही”, असं म्हणत आरोग्यमंत्री राणे यांनी संबंधित डॉक्टरांची तात्काळ सस्पेंड ऑर्डर काढण्याचे आदेश दिले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचा आदेश रद्द करत संबंधित डॉक्टरांचं निलंबन होणार नसल्याचं स्पष्ट केलं. गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी आदेश दिल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज (८ जून) मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला आणिराणे यांचा आदेश रद्द केला