मृतांचा आकडा ७१९ वर
हज यात्रेतील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा ७१९ वर पोहोचला असून त्यामध्ये १४ भारतीयांचा समावेश आहे. गेल्या २५ वर्षांतील ही सर्वात भीषण दुर्घटना ठरली आहे.
हज यात्रेच्या शेवटच्या दिवशी सैतानाला दगड मारताना झालेल्या चेंगराचेंगरीत ८६३ जण जखमी झाले होते. या यात्रेत जगभरातील १८० देशांमधून वीस लाख यात्रेकरू सहभागी झाले होते. या वर्षीच्या हज यात्रेत १.५ लाख भारतीय सहभागी झाले होते. दरवर्षी भरणाऱ्या या यात्रेच्या शेवटच्या दिवशी सैतानाला दगड मारण्याची प्रथा असते. मक्केपासून पाच किमी अंतरावर असलेल्या मीना येथील मुख्य मशिदीच्या परिसरात सैतानाला दगड मारताना दोन यात्रेकरूंचे गट एकत्र आल्यामुळे गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली. सुरुवातीला या दुर्घटनेत चार भारतीयांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, या चेंगराचेंगरीत १४ भारतीयांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
सौदी अरेबियातील दूतावासातून या चेंगराचेंगरीत १४ भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली, तर १३ भारतीय जखमी झाले आहेत. मात्र, अद्याप सौदी अरेबियाकडून मृतांची आणि जखमींची संख्या स्पष्ट करण्यात आलेली नाही, असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितले.
मक्का येथील मशिदीत दोन आठवडय़ांपूर्वी क्रेन कोसळून झालेल्या अपघातात ११ भारतीयांसह १०९ जणांचा मृत्यू झाला होता. मक्केतील ही दुसऱ्या क्रमांकाची भीषण दुर्घटना आहे. याआधी, १९९० मध्ये झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत १४२६ जणांना प्राण गमवावे लागले होते. गुरुवारी झालेल्या या दुर्घटनेत इराणमधील
१३१, तर पाकिस्तानमधील सहा यात्रेकरूंना प्राण गमवावे लागले आहेत. सौदी अरेबियाचे राजे सलमान यांनी यात्रेकरूंच्या सुरक्षिततेसाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
हज यात्रेतील मृत भारतीयांची नावे- शमशुद्दीन इब्राहिम (तामिळनाडू), मोहिद्दीन पिचल (तामिळनाडू), मोहम्मद रुस्तम अली (झारखंड), निझुल हक (झारखंड), सलीम शेख (महाराष्ट्र), मोहम्मद हसन (गुजरात), मोहम्मद मोदिनाबिबी (गुजरात), दिवान आयुबशा बफेसाह (गुजरात), दिवान जुबेदाबिबी आयुबशा (गुजरात), सोदा रेहमत कसम (गुजरात), बेतारा फातमाबेन करीम (गुजरात), बोलिम हवाबाई ईशाक (गुजरात), नागोरी जोहराबिबी (गुजरात), नागोरी रुखसाना मोहम्मद इशाक (गुजरात).