झाबुआ : मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यामध्ये बुधवारी पहाटे एक सिमेंटने भरलेला ट्रेलर ट्रक उलटला आणि एका व्हॅनला धडकला. यामुळे झालेल्या अपघातात पाच अल्पवयीन मुलांसह नऊ जणांचा मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली. तसेच दोघेजण जखमी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले असून मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर केली आहे.
अपघातग्रस्त दोन कुटुंबांमधील असून ते बुधवारी पहाटे एका विवाह सोहळ्यावरून त्यांच्या महुदा या गावी परत जात असताना मेघनगर तालुक्यात पहाटे २.३०च्या सुमाराला अपघात झाला. झाबुआचे पोलीस अधीक्षक पद्माविलोचन शुक्ला यांनी सांगितले की सिमेंट भरलेला ट्रेलर ट्रक संजेली रेल्वे क्रॉसिंगजवळ उलटला, त्याच्याखाली व्हॅन चिरडली गेली.
मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान आणि मुख्यमंत्री या दोघांनीही प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींना ५० हजार देण्याची घोषणा करण्यात आली आहे.