India-US Trade Deal Details: भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करार अंतिम टप्प्यात असल्याची चर्चा आहे. अशात केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी या प्रकरणी मोठी टिप्पणी केली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, भारताला अंतिम मुदतीच्या आधारावर कोणताही मोठा व्यापार करार अंतिम करण्याची घाई नाही. परंतु जर तो दोन्ही पक्षांसाठी फायदेशीर असेल, तरच निर्णय घेतला जाईल. यावेळी पीयूष गोयल यांनी आंतरराष्ट्रीय व्यापार वाटाघाटींबाबत भारताचा दृष्टिकोन दृढ आणि तत्वनिष्ठ आहे, यावर भर दिला.
भारत आपल्या श्रम-केंद्रित वस्तूंसाठी आणखी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असताना, अमेरिकेला त्यांच्या कृषी उत्पादनांसाठी कर सवलती हव्या आहेत. अमेरिकेच्या टॅरिफच्या स्थगितीची मुदत ९ जुलै रोजी संपत असल्याने या चर्चा महत्त्वाच्या ठरतात. त्यापूर्वी दोन्ही देश व्यापार कराराच्या चर्चा अंतिम करण्याचा विचार करत आहेत.
“हा करार दोन्ही देशांसाठी फायदेशीर असला पाहिजे आणि तो भारताच्या हिताचा असला पाहिजे. याचबरोबर राष्ट्रीय हित नेहमीच सर्वोच्च स्थानी असेल. हे लक्षात घेऊन जर चांगला करार झाला, तरच भारत विकसित देशांसोबत काम करण्यास तयार असेल,” असे पीयूष गोयल दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले.
“युरोपियन युनियन, न्यूझीलंड, ओमान, अमेरिका, चिली किंवा पेरू असोत या विविध देशांशी व्यापार चर्चा सुरू आहे,” असेही ते म्हणाले.
“मुक्त व्यापार करार तेव्हाच शक्य आहे, जेव्हा तो परस्पर फायद्याचा असेल. भारत कधीही अंतिम मुदतीच्या किंवा वेळेच्या दबावाखाली व्यापार करार करणार नाही. जेव्हा करार पूर्णपणे परिपक्व असेल, चांगल्या प्रकारे वाटाघाटी केलेला असेल आणि राष्ट्रीय हिताचा असेल, तरच तो स्वीकारला जाईल,” असे गोयल पुढे म्हणाले.
युक्रेनमधील युद्धावरून पाश्चिमात्य देशांकडून निर्बंधांच्या धमकीदरम्यान रशियन तेल खरेदी करण्याबाबत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी यापूर्वी जे म्हटले होते, त्याच्याशी गोयल यांचे विधान मिळते-जुळते आहे. त्यावेळी त्यांनी म्हटले होते की, भारत देशातील नागरिकांच्या हितासाठी आणि सर्वोत्तम किंमतीत तेल विकणाऱ्या प्रत्येक देशाकडून तेल खरेदी करेल.