जेरुसलेम : इस्रायल आणि इराणदरम्यान १२ दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष थांबवण्यासाठी दोन्ही देशांनी युद्धविरामाचा प्रस्ताव स्वीकारल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले. मात्र, त्यानंतर काहीच तासांतच इराणने आपल्यावर क्षेपणास्त्र डागल्याचा आरोप करत इस्रायलने तेहरानवर हल्ला चढविला. त्यामुळे संतापलेल्या ट्रम्प यांनी इस्रायलची खरडपट्टी काढत विमाने तातडीने परत बोलाविण्याचा ‘आदेश’ इस्रायलला दिला.

कतार आणि इराकमधील अमेरिकी तळांवर इराणने सोमवारी रात्री हल्ले केल्यानंतर युद्ध चिघळण्याची भीती व्यक्त होत होती. मात्र मंगळवारी ट्रम्प यांनी अचानक इराण आणि इस्रायल युद्धविरामाला तयार झाले असून दोन्ही देशांत शस्त्रसंधी झाला असल्याचे समाजमाध्यमावर जाहीर केले. याला इस्रायल आणि इराणकडूनही दुजोरा देण्यात आला. यामुळे पश्चिम आशियाने मोकळा श्वास घेतला असतानाच इराणने पुन्हा क्षेपणास्त्रे डागल्याचा आरोप इस्रायलने केला.

इराणने आरोपाचा इन्कार केल्यानंतरही प्रत्युत्तरादाखल तेहरानवर हवाई हल्ला चढवून तेथील रडार केंद्र नष्ट केल्याचा दावा इस्रायलने केला. त्यावर संतापलेल्या ट्रम्प यांनी समाजमाध्यमावर इस्रायलला खडसावले. ‘‘इस्रायल… बॉम्ब टाकणे थांबवा. जर तुम्ही हे थांबविले नाही, तर ते (युद्धविरामाचे) गंभीर उल्लंघन ठरेल. तुमच्या वैमानिकांना लगेच परत बोलवा! आत्ताच्या आत्ता!’’ असे त्यांनी समाजमाध्यमावर लिहिलेच शिवाय इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांना दूरध्वनी करूनही हल्ला न करण्याबाबत स्पष्ट शब्दांत बजावले. त्यानंतर इस्रायलने हल्ले थांबविण्याचे आश्वासन दिल्याचा दावा ‘व्हाईट हाऊस’कडून करण्यात आला. इराणला युद्धविरामासाठी तयार करण्यात कतारने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे मानले जात आहे.

युद्धविराम सुरू झाल्यानंतर साधारण अडीच तासांनी इराणने क्षेपणास्त्रे सोडल्याचे आम्हाला आढळले. तेहरानमधील निमलष्करी आणि सरकारी लक्ष्यांवर हल्ले सुरू करण्याची सूचना मी दिली आहे. – इस्रायल काट्झ, संरक्षणमंत्री, इस्रायल

इराणने युद्धविरामाचे उल्लंघन केले, पण इस्रायलनेही केले. मी इस्रायलवर नाराज आहे. शस्त्रसंधी झाल्यानंतर इस्रायलने लगेचच हल्ले केले हे मला आवडले नाही. आता मला असे समजले की, इराणने रॉकेट हल्ला केल्याचे वाटल्याने इस्रायलने पुन्हा हल्ला केला. पण हे रॉकेट कुठेही पडले नाही. – डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष, अमेरिका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युद्धविरामाचे स्वागत

इजिप्त आणि सौदी अरेबियाने युद्धविरामाच्या घोषणेचे स्वागत केले. संघर्ष थांबवण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी हे महत्त्वाचे असल्याचे इजिप्तने म्हटले आहे. तर येणाऱ्या दिवसांमध्ये तणाव कमी करण्यासाठी सर्वजण कटिबद्ध असतील अशी आशा सौदी अरेबियाने व्यक्त केली.