नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या उपाहारगृहातील निकृष्ट दर्जाच्या अन्नाचा निषेध करणाऱ्या शिवसेनेच्या खासदारांनी येथील एका मुस्लीम कर्मचाऱ्याच्या तोंडात पोळी कोंबून त्याचा ‘रोजा’ मोडल्याच्या घटनेने बुधवारी सर्वत्र खळबळ उडवून दिली. शिवसेनेच्या खासदारांच्या या कृत्याची चित्रफीत माध्यमांमधून प्रसारित झाल्यानंतर या प्रकरणावरून संसदेत मोठा गदारोळ झाला. शिवसेनेने मुस्लीम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याची टीका करून विरोधकांनी सभागृह डोक्यावर घेतले. तर, ‘तो तरुण मुस्लीम होता, याची कल्पना आम्हाला नव्हती’ असे सांगत शिवसेनेने दिलगिरी व्यक्त केली.  
महाराष्ट्र सदनामधील गैरसोयी, येथे मराठी खासदारांना मिळणारी दुय्यम वागणूक यांवरून शिवसेनेने गेल्या काही दिवसांपासून आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्याच आंदोलनादरम्यान, १७ जुलै रोजी महाराष्ट्र सदनाच्या उपाहारगृहात शिरलेल्या ११ शिवसेना खासदारांनी येथील अर्शद झुबेर या कर्मचाऱ्याला घेराव घातला व ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी त्याच्या तोंडात बळजबरीने पोळी कोंबली. त्यामुळे अर्शदचा रमजानचा रोजा मोडला गेला. याबाबतचे वृत्त ‘इंडियन एक्स्प्रेस’ने प्रसिद्ध केल्यानंतर प्रारंभी शिवसेना खासदारांनी असे काहीही न घडल्याचा दावा केला. मात्र, या घटनेची चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर ‘तो तरुण कोणत्या धर्माचा होता, याची कल्पना नव्हती,’ अशी सारवासारव पक्षाने केली. तर राजन विचारे यांनी या तरुणाची माफी मागितली.
या मुद्दय़ावरून बुधवारी दिवसभर संसदेत गदारोळ सुरू होता. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यापासून विरोधी बाकांवरील सर्व पक्षांच्या सदस्यांनी शिवसेना खासदारांवर जोरदार टीका केली. मात्र, ‘या प्रकरणात नेमके काय घडले हे कुणालाच माहीत नसल्याने या आरोपांची सत्यता पडताळून पाहिली पाहिजे,’ अशी भूमिका केंद्र सरकारने घेतली.
संसदेत हमरीतुमरी
शिवसेना खासदारांच्या कथित कृत्याचे तीव्र पडसाद संसदेत उमटले. या प्रकारामुळे काही काळ सभागृहातदेखील तणाव निर्माण झाला होता. भाजप खासदार रमेश बिधुडी ‘हा हिंदुस्थान आहे, इथे राहायचे असेल तर राहा; अन्यथा ..ला जा,’ असे म्हणत ओवेसी यांच्या अंगावर धावून जाऊ लागले. त्यावर ओवेसी यांनीही त्यांच्या अंगावर धाव घेतली. त्या वेळी अन्य सदस्यांनी या दोघांना आवरल्याने अनर्थ टळला. नंतर असंसदीय वर्तन केल्याप्रकरणी बिधुडी यांनी सभागृहाची क्षमा मागितली.
‘आयआरसीटीसी’चे कंत्राट रद्द
महाराष्ट्र सदनातील सोयीसुविधांच्या तक्रारीची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गंभीर दखल घेतली असून ‘आयआरसीटीसी’ची उपाहारगृह सेवा बंद करण्यात आली आहे. उपाहारगृहासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र खासदारांचे वर्तन योग्य नसून लोकप्रतिनिधींनी आपली जबाबदारी ओळखून वर्तणूक ठेवणे आवश्यक असल्याची टिप्पणी मुख्यमंत्री चव्हाण यांनी केली आहे.