Jaipur Couple: जयपूरमधल्या एका घरात विवाहित जोडप्याचे मृतदेह आढळून आले आहेत. या दोघांनीही आत्महत्या करुन आयुष्य संपवलं असावं असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र या घटनेमागे हत्येचा काही पैलू आहे का? याचाही तपास पोलीस करत आहेत. शुक्रवारी या दोघांचे मृतदेह जयपूर या ठिकाणी असलेल्या मुहाना या भागात त्यांच्याच घरात सापडले. गुरुवारी या दोघांचं भांडणाचं सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागलं आहे.

धर्मेंद्र आणि सुमन या दोघांचे मृतदेह त्यांच्याच घरात आढळले

धर्मेंद्र आणि सुमन अशी मृतदेह आढळलेल्या दोघांची नावं आहेत. धर्मेंद्र बँकेत काम करत होता. तो बँकेत आला नाही त्यामुळे त्याच्या बँकेतील मॅनेजरने त्याला फोन केले. मात्र धर्मेंद्रने एकही फोन उचलला नाही. त्यानंतर त्याच्या एका मित्राला धर्मेंद्रच्या नातेवाईकांनी धर्मेंद्र आणि सुमन यांच्या घरी पाठवलं. हा मित्र जेव्हा घरी आला तेव्हा त्याला या दोघांचे मृतदेह घरात आढळून आले. यानंतर तातडीने पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे पोलिसांनी या घटनेसंदर्भात इमारतीचं सीसीटीव्ही फुटेज चेक केलं. त्यात पोलिसांना कळलं की गुरुवारी दुपारी हे दोघंही पार्किंगच्या भागात काहीतरी कारणावरुन वादावादी करत होते. या दोघांनी आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. मात्र या दोघांमध्ये वाद नेमका काय झाला ते पोलिसांना समजलेलं नाही. एनडीटीव्हीने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय दिसतं आहे?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुमन तिच्या नवऱ्याला म्हणजेच धर्मेंद्रला कारने बाहेर जाण्यापासून अडवत होती. त्यावेळी त्याने सुरु केलेली कार थांबवली आणि त्याचवेळी या दोघांचा वाद झाला. त्यानंतर सुमनने आपलं डोकं त्याच्या खांद्यावर ठेवलं आणि त्याचा हात धरला. या सगळ्यानंतर दोघंही कारच्या बाहेर आले. त्यावेळी धर्मेंद्रचा हात सुमनच्या खांद्यावरच होता असं या फुटेजमध्ये दिसतं आहे. तसंच आदल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी संध्याकाळी एकत्र इमारतीत शिरताना दिसत आहेत. यावेळी सुमनकडे एक बॅग होती असंही दिसतं आहे. हे दोघं जिवंत असतानाचं हे शेवटचं फुटेज आहे असं पोलिसांनी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुमनच्या वडिलांनी काय म्हटलं आहे?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना प्राथमिक अंदाजानुसार या दोघांनी आत्महत्या केली आहे असं दिसतं आहे. पण या दोघांची हत्या तर झालेली नाही ना? असा पैलू तपासला जातो आहे. या दोघांची आर्थिक स्थिती चांगली होती. धर्मेंद्र बँकेत काम करत होता. तर सुमन ही गृहिणी होती. या दोघांना दोन मुली आहेत. त्यापैकी एक ११ वर्षांची आहे तर दुसरी आठ वर्षे वयाची आहे. सध्या या दोन्ही मुली आजी-आजोबांकडे राहतात. धर्मेंद्रचा मित्र म्हणाला की या दोघांनी आर्थिक कारणांमुळे आत्महत्या केली असेल असं वाटत नाही. सुमनच्या वडिलांनी मात्र वेगळाच आरोप केला आहे. सुमनच्या शरीरावर काही जखमांचे वण दिसत आहेत. त्यामुळे तिची आणि जावयाची हत्या झाली असावी या अनुषंगाने तपास केला गेला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.