Farooq Abdullah : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला हे त्यांच्या विधानामुळे कायम चर्चेत असतात. आता फारुख अब्दुल्ला यांनी भारतीय लष्कराबाबत केलेल्या एका विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. देशाच्या सीमेवर सुरक्षा करणारे सैनिक आणि दहशतवाद्यांमध्ये संगनमत असल्याचा गंभीर आरोप फारुख अब्दुल्ला यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

देशाच्या सीमेवर सुरक्षा लष्कराचे जवान तैनात असतानाही घुसखोरी कशी होते? असा सवाल माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी उपस्थित केला आहे. फारुख अब्दुल्ला म्हणाले, “आपल्या देशाच्या सीमेवर मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात आहे. मग इतके मोठे अस्तित्व असूनही दहशतवादी भारतीय हद्दीत घुसखोरी करत आहेत. अंमली पदार्थांची तस्करीही केली जाते. मग मोठ्या प्रमाणावर लष्कर तैनात असूनही हे कसे होऊ शकते? सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये संगनमत आहे. हे आपल्या विनाशासाठी मिळालेले आहेत”, असं फारुख अब्दुल्ला यांनी म्हटल्याचं वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

हेही वाचा : Rahul Gandhi : शेअर मार्केटमध्ये रिस्क! “गुंतवणूकदारांनी पैसे गमावले तर…”, हिंडेनबर्ग प्रकरणावरून राहुल गांधींचा सवाल

जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात फारुख अब्दुल्ला हे आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. अब्दुल्ला यांनी स्पष्ट केलं की, शेकडोच्या संख्येने दहशतवादी आणि ड्रग्ज देशात कसे प्रवेश करत आहेत? याची उत्तरे मिळायला हवी. याबाबत कोणाची तरी जबाबदारी निश्चित केली पाहिजे. सीमा हा केंद्र सरकारचा विषय आहे आणि आमचे गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री यांनी या संदर्भात बोललं पाहिजे”, असं फारुख अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे. दरम्यान, फारुख अब्दुल्ला यांनी यांच्या या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारने देशाला उत्तर द्यावं

फारुख अब्दुल्ला यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं की, “सुमारे २००-३०० दहशतवादी कसे आले? ते कुठून आले आहेत? कोणी जबाबदार आहे का? कोण कोणाची फसवणूक करत आहे? कोण मरत आहे तर आमचे कर्नल, मेजर आणि सैनिक. हे सर्व कसं घडत आहे? यावर केंद्र सरकारने देशाला उत्तर द्यायला हवं”, असंही फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फारुख अब्दुल्ला यांच्या या वक्तव्यानंतर गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वाखालील डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीने (डीपीएपी) आक्षेप घेतला आहे. फारुख अब्दुल्ला यांनी केलेले आरोप हे दुर्दैवी असल्याचं डीपीएपीने म्हटलं आहे. “फारूख अब्दुल्ला हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी भारतीय लष्कराच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं हे दुर्दैवी आहे. त्यांचं हे विधान म्हणजे देशासाठी बलिदान देणाऱ्या भारतीय लष्कराच्या शूर सैनिकांच्या बलिदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासारखं आहे”, असं डीपीएपीचे प्रवक्ते अश्वनी हांडा यांनी म्हटलं आहे.