काही दिवसांपूर्वीच माजी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल यांनी JEE Main परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या होत्या. या तारखांनुसार जेईईची मेनच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा २० जुलैपासून २५ जुलै या कालावधीत होणार होत्या. तर जेईई मेनच्या चौथ्या टप्प्यातील परीक्षा २७ जुलै ते २ ऑगस्ट यादरम्यान होणार होत्या. मात्र, त्या तारखांमध्ये आता बदल करण्यात आला आहे. नवे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यासंदर्भात ट्वीट करून माहिती दिली आहे. तसेच, या परीक्षांसाठीचे अर्ज भरण्यासाठी देखील मुदतवाढ देण्याचा निर्णय झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

काय आहेत नवीन बदल?

धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार, JEE Main परीक्षेच्या तिसऱ्या टप्प्यातील तारखा त्याच राहणार आहेत. म्हणजेच, तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा २० जुलै ते २५ जुलै यादरम्यानच होणार आहेत. मात्र, चौथ्या टप्प्यातील परीक्षेच्या तारखांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. यानुसार चौथ्या टप्प्यातील परीक्षा २६ ऑगस्ट, २७ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट, १ सप्टेंबर आणि २ सप्टेंबर या दिवशी घेण्यात येतील. एकूण ७ लाख ३२ हजार परीक्षार्थींनी जेईई मेनच्या चौथ्या टप्प्यासाठी नोंदणी केली आहे, अशी माहिती देखील धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे.

 

नोंदणीच्या मुदतीमध्ये देखील वाढ!

दरम्यान, परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्यानंतर त्यासाठीच्या नोंदणीसाठीच्या मुदतीमध्ये देखील वाढ करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विटरवर दिली आहे. “जेईई मेनच्या चौथ्या सेशनसाठीची नोंदणी प्रक्रिया अजूनही सुरू आहे. पण आता परीक्षेच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्यामुळे नोंदणीची मुदत देखील २० जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे”, असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

 

…म्हणून केला तारखांमध्ये बदल

आधी तारखा जाहीर केल्यानंतर अवघ्या १० दिवसांच्या आत त्यामध्ये बदल करण्यात आले आहेत. याचं कारण देखील शिक्षणमंत्र्यांनी आपल्या ट्वीटमध्ये नमूद केलं आहे. “विद्यार्थी वर्गाकडून सातत्याने मागणी केली जात होती. तसेच, विद्यार्थ्यांना पूर्ण क्षमतेनं या परीक्षा देता याव्यात, यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीला तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यामध्ये ४ आठवड्यांचं अंतर ठेवण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानुसार या परीक्षांच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत”, असं प्रधान यांनी ट्वीटमध्ये नमूद केलं आहे.