नांदेड : हैदराबाद संस्थानच्या स्वातंत्र्यलढय़ातील महत्त्वाचे केंद्र राहिलेल्या ऐतिहासिक नांदेड नगरीमध्ये रविवारी भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाने आपला गुलाबी झेंडा रोवला. या पक्षाचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी ‘अबकी बार, किसान सरकार’ असा निर्धार महाराष्ट्रातील पहिल्या जाहीर सभेत व्यक्त केला. स्वातंत्र्याची ७५ वर्षे उलटल्यानंतरही देश आणि देशवासीयांच्या मूलभूत समस्या सुटलेल्या नाहीत, असे सांगत राव यांनी काँग्रेससह भाजपवर तोफ डागली.
राव यांनी पुढच्या १० दिवसांत राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये पक्षाच्या ‘किसान कमिटय़ा’ स्थापन करण्याची घोषणा या वेळी केली. याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी गडावरून होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. देशातील सध्याची स्थिती बदलायची असेल तर ते शेतकऱ्यांचे सरकार आल्यावरच बदलेल, असा विश्वास त्यांनी वारंवार व्यक्त केला.
नांदेड रेल्वे स्थानकाजवळील गुरुद्वारा बोर्डाच्या पटांगणावर झालेल्या ‘बीआरएस’च्या या पहिल्या सभेला मोठा प्रतिसाद मिळाला. गडचिरोलीपासून बीड-नगपर्यंतच्या वेगवेगळय़ा पक्षांतील असंख्य कार्यकर्त्यांना भारत राष्ट्र समितीत प्रवेश दिल्यानंतर राव यांनी सुमारे ४० मिनिटे भाषण केले.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज तसेच महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचे स्मरण करून राव यांनी आपल्या पक्षविस्ताराची, त्यामागच्या उद्दिष्टांची माहिती दिली. देशाने ७५ वर्षांत वेगवेगळय़ा नेत्यांची, वेगवेगळय़ा पक्षांची सरकारे पाहिली. पण स्वातंत्र्यांच्या ७५ वर्षांनंतरही पाणी, वीज आणि इतर प्रश्न त्यांना सोडवता आलेले नाहीत, असे राव यांनी नमूद केले.
‘जोक इन इंडिया’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही राव यांनी टीका केली. पंतप्रधान झाल्यावर मोदींनी ‘मेक इन इंडिया’चा नारा दिला, तो आता ‘जोक इन इंडिया’ झाल्याची टिप्पणी करून देशातल्या बाजारपेठेत रंग, मांजा, दिवे, फटाके अशा अनेक वस्तू चीनहून येत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
स्वामी रामानंद तीर्थ यांचा विसर
तेलंगणासह आजच्या मराठवाडय़ाच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी पर्व सध्या सुरू आहे; पण के.चंद्रशेखर राव यांनी जाहीर सभेतील आपल्या भाषणात त्याचा किंवा हैदराबाद संस्थानाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने लढलेल्या व नेतृत्व केलेल्या स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नावाचा साधा उल्लेखही केला नाही.