लष्कर-ए- तोयबा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आणि 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदला आता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दणका दिला आहे. ईडीने हाफिज सईदचा गुरुग्राममधील बंगला जप्त केला असून या बंगल्याची किंमत कोट्यवधी रुपये असल्याचे समजते.

“द प्रिंट” या न्यूज वेबसाईटला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हाफिज सईदने काश्मीरमधील उद्योजक जहूर अहमद शाहर वटाली याच्या मदतीने गुरुग्राममध्ये बंगला विकत घेतला होता. या बंगल्यासाठीचे पैसे सईदने फलाह-ए- इन्सानियत फाऊंडेशन (एफआयएफ) या संस्थेच्या माध्यमातून उभे केल्याचा संशय ईडीला आहे. जहूरला गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये दहशतवादाला आर्थिक रसद पुरवल्याप्रकरणी अटक झाली होती. त्याच्या चौकशीतून हाफिज सईदच्या मालमत्तेचा उलगडा झाला.

बंगल्यासाठीचे पैसे यूएईतून हवालामार्गे भारतात आल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. हाफिज सईदने बनावट नावांचा वापर करुन भारतात तब्बल 24 ठिकाणी मालमत्ता खरेदी केल्याचे ईडीच्या तपासातून समोर आले आहे. उर्वरित मालमत्तांवरही लवकरच जप्तीची कारवाई केली जाईल, असे ईडीतील सूत्रांनी सांगितले. मालमत्तेच्या खरेदीसाठी वापरण्यात आलेल्या बँक खात्यांचा तपशीलही ईडीने गोळा केल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

दरम्यान, पुलवामा येथील हल्ल्यानंतर हाफिज सईद आणि मसूद अझहर या मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांविरोधात भारताने कठोर भूमिक घेतली आहे. लष्कर-ए-तोयबाचा सहसंस्थापक हाफिजवर मुंबई हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने १० डिसेंबर २००८ बंदी घातली होती. हाफिजने २०१७ मध्ये या बंदीविरोधात लाहोर येथील लॉ फर्म मिर्झा अँड मिर्झाच्या माध्यमातून अपील दाखल केले होते. तेव्हा तो पाकिस्तानमध्ये नजरकैदेत होता. प्रतिबंधित दहशतवाद्यांच्या यादीतून वगळण्याचे सईदचे अपील संयुक्त राष्ट्राने नुकतेच फेटाळले होते.