लखनौ : काँग्रेस नेते अजय राय यांचे भाऊ अवधेश राय यांच्या ३० वर्षांहून अधिक काळापूर्वी झालेल्या हत्याप्रकरणी एकेकाळचा कुख्यात गुंड व सध्याचा राजकीय नेता मुख्तार अन्सारीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. खासदार-आमदारांसाठीच्या न्यायालयाचे विशेष न्यायाधीश अवनीश गौतम यांनी मुख्तार अन्सारी याला ही शिक्षा सुनावली.
३ ऑगस्ट १९९१ रोजी अजय राय आणि त्यांचे बंधू अवधेश वाराणसीतील लहुराबीर येथील त्यांच्या घराच्या प्रवेशद्वारापाशी उभे होते. तेव्हा अन्सारी याच्यासह काही हल्लेखोर मोटारीतून तेथे आले व त्यांनी अवधेश यांच्यावर गोळी झाडली. अजय रायने प्रत्युत्तरादाखल आपल्या परवाना असलेल्या पिस्तुलातून गोळीबार केला. त्यांनंतर हल्लेखोर मोटार सोडून पळून गेले. अवधेश यांना कबीरचौरा येथील रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते. या प्रकरणी अन्सारी आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अन्सारीविरुद्ध विविध राज्यांत ६१ गुन्हेगारी खटले दाखल आहेत. त्यापैकी सहा प्रकरणांत त्याला दोषी ठरवले आहे. त्याला गाझीपूर न्यायालयाने दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.




न्यायाधीश अवनीश गौतम यांनी अन्सारीला जन्मठेपेची शिक्षा सुनावताना एक लाख २० हजारांचा दंडही ठोठावल्याची माहिती वकिलांनी न्यायालयाबाहेर पत्रकारांना दिली. अन्सारी या सुनावणीसाठी बांदा कारागृहातून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाला होता. अन्सारीच्या वकिलांनी निकाल देताना अन्सारीचे वय लक्षात घ्यावे, अशी विनंती न्यायालयाला केली होती. या निकालाचा तपशीलवार अभ्यास करून आम्ही वरिष्ठ न्यायालयात या निकालाविरुद्ध न्याय मागू, असेही अन्सारीच्या वकिलांनी सांगितले. अवधेश बंधू अजय राय सध्या काँग्रेसच्या उत्तर प्रदेश शाखेचे प्रयागराज विभागाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले. ते म्हणाले, की आमच्या ३२ वर्षांच्या संघर्षांची आज सांगता झाली.