Bilaspur Train Accident : छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये झालेल्या रेल्वे अपघातात तब्बल ११ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. ही दुर्घटना बिलासपूर–कटनी रेल्वे विभागातील लाल खदान परिसरात मंगळवारी घडली. कोरोबा पॅसेंजर (क्रमांक ६८७३३) आणि एका मालगाडीची समोरासमोर धडक झाली आणि पॅसेंजर गाडीचे काही डबे रुळांवरून घसरले. या घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला होता.

बिलासपूर रेल्वे अपघातामागील कारण काय? हा अपघात नेमका कसा घडला? यात कोणाची चूक? या संदर्भाने तपास करण्यात येत आहे. मात्र, सध्या प्राथमिक तपासात मोठी माहिती समोर आली आहे. बिलासपूर रेल्वे अपघाताच्या प्राथमिक चौकशी अहवालात बिलासपूरला जाणाऱ्या मेनलाइन इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट (MEMU) पॅसेंजर ट्रेनच्या कर्मचाऱ्यांना यासाठी जबाबदार धरलं जात आहे.

बिलासपूर येथे मुख्यालय असलेल्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने (SECR) आपल्या अहवालात म्हटलं की, “धोक्याच्या सिग्नलपूर्वी योग्य वेळी आणि योग्य स्थितीत ट्रेन नियंत्रित न केल्याबद्दल क्रू जबाबदार आहेत. कारण ते SPAD (धोक्याच्या वेळी सिग्नल पास करणे) सिग्नलवर ट्रेन नियंत्रित करण्यात अयशस्वी ठरले आहेत. अहवालात असंही म्हटलं आहे की अपघात होण्यापूर्वी प्रवासी ट्रेनचा वेग ७६ किमी प्रतितास होता. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

या संपूर्ण अपघाताची चौकशी सुरू असून अपघाताचं नेमकं कारण संपूर्ण चौकशीनंतर स्पष्ट होईल. दरम्यान, केंद्रीय जनसंपर्क अधिकारी (सीपीआरओ) आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) यांच्या या घटनेबाबत प्रतिक्रिया समोर आलेल्या नाहीत. दरम्यान, रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी बुधवारी या घटनेची चौकशी सुरू केली.

या प्रकरणात बिलासपूर पोलिसांनी रेल्वे कर्मचाऱ्यांनी दिलेल्या मेमोच्या आधारे एफआयआर नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. पण सध्या हे स्पष्ट होत नाही की सिग्नल बिघाडामुळे ही घटना घडली की सिग्नलवर ट्रेन न थंबल्यामुळे? लोको पायलटच्या केबिनमध्ये कॅमेरे असते तर तपास करणे सोपे झाले असते, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं आहे. या घटनेतून बचावलेल्या परंतु उपचारासाठी रुग्णालयात दाखल असलेल्या सहाय्यक लोको पायलटची आता पोलीस चौकशी करतील.