Middle East Conflict Donald Trump : गेल्या दोन वर्षांपासून चालू असलेलं इस्रायल-गाझा युद्ध थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इस्रायलने त्यासाठी एक पाऊल पुढे टाकण्याची तयारी दर्शवली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी (१ जुलै) याची माहिती देत हमासला हा करार मान्य करण्याचं आवाहन केलं आहे. ट्रम्प यांनी यासंदर्भात समाजमाध्यमांवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की इस्रायल गाझामध्ये ६० दिवसांसाठी शस्त्रविराम करण्यास तयार आहे. तसेच अमेरिका व इतर देश हे युद्ध पूर्णपणे समाप्त करण्याच्या दिशेने काम करतील. ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्या अमेरिका दौऱ्याआधी ही घोषणा केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “अमेरिकेच्या प्रतिनिधीमंडळाने गाझाच्या गंभीर मुद्द्यावर इस्रायलबरोबर चर्चा केली. या बैठकीत इस्रायल काही अटी व शर्तींसह ६० दिवसांच्या शस्त्रविरामासाठी तयार झाला आहे. आता कतार व इजिप्त मिळून मध्यस्थ म्हणून शस्त्रविरामाबाबतचा अंतिम प्रस्ताव सादर करतील. हा एक चांगला करार आहे. तसेच मला आशा वाटतेय की पश्चिम आशियाच्या भल्यासाठी हमास हा करार स्वीकारेल. कारण युद्ध असंच चालू राहिलं तर स्थिती आणखी खराब होईल. स्थिती हाताबाहेर जाण्याआधी शस्त्रविराम होणं गरजेचं आहे.”
नेतान्याहू अमेरिका दौऱ्यावर जाणार
इस्रायलचे धोरणात्मक व्यवहार मंत्री रॉन डर्मर यांनी मंगळवारी वॉशिंग्टनमध्ये ट्रम्प प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यात गाझा, इराण युद्ध आणि इतर काही विषयांवर चर्चा झाली. तसेच युद्धसमाप्तीबाबतही चर्चा झाली. इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू येत्या सोमवारी अमेरिका दौऱ्यावर जाणार असून वॉशिंग्टनमधील व्हाइट हाऊसमध्ये त्यांची डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर महत्त्वाची बैठक होऊ शकते. दरम्यान, ट्रम्प यांनी शस्त्रविरामाची घोषणा केली आहे.
सध्या संपूर्ण जगाचं गाझाकडे लक्ष आहे. अशातच इस्रायलने शस्त्रविरामासाठी एक पाऊल पुढे टाकल्यानंतर आता हमास काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. हमासने यापूर्वी म्हटलं होतं की इस्रायली सैन्याने पूर्णपणे माघार घेतली तर ते गाझामधील युद्ध संपवतील. ओलीस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांना मुक्त करतील. दरम्यान, असाच प्रस्ताव यापूर्वी हमासनेही दिला होता. मात्र, इस्रायलने तेव्हा तो नाकारला होता. आता अमेरिकेशी केलेल्या चर्चेनंतर इस्रायल शस्त्रविरामासाठी पुढे सरसावला आहे.