एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका विधानावरुन टोला लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी गुजरातमधील एका कार्यक्रमात बोलताना ‘आधी देश कबूतर सोडायचा, आता चिते सोडण्याचं सामर्थ्य आहे’ असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानावर असदुद्दीन ओवेसी यांनी ‘आणि बलात्कारी’ असा टोला लगावला आहे.

Bilkis Bano Case: मोदी सरकारकडून आरोपींच्या सुटकेसाठी दोन आठवड्यात मान्यता, सीबीआय, न्यायाधीशांचा होता विरोध; मोठा खुलासा

ओवेसींनी बिल्किस बानो प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींवर ही टीका केल्याचं बोललं जात आहे. गुजरात सरकारने बिल्किस बानो प्रकरणातील ११ आरोपींची सुटका केली आहे. यानंतर देशभरात नाराजी असून, हा निर्णय़ मागे घेतला जावा अशी मागणी होत आहे. सुप्रीम कोर्टातही याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आली आहे.

मोदींनी बिल्किस बानोच्या कुटुंबाची भेट घ्यावी – ओवेसी

असदुद्दीन ओवेसींनी याआधी बिल्किस बानो आणि अंकिता हत्या प्रकरणावरुन भाजपा सरकारला लक्ष्य केलं होतं. मोदींनी गुजरातमधील अंबाजी येथे केलेल्या भाषणात महिलां सन्मान केल्याचा उल्लेख केला होता. ओवेसी यांनी त्यावरुनही मोदींवर टीका केली होती. “कृपया बिल्किस बानो आणि अंकिताच्या कुटुंबाला भेटा, त्यांना कदाचित तुम्हाला काहीतरी सांगायचं असेल,” असं ट्वीट ओवेसी यांनी केलं होतं.

मोदी सरकारकडून आरोपींच्या सुटकेसाठी दोन आठवड्यात मान्यता

बिल्किस बानो प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या ११ दोषींच्या सुटकेच्या प्रस्तावाला केंद्रीय गृह मंत्रालयाने दोन आठवड्यात मान्यता दिल्याचं समोर आलं आहे. न्यायालयाच्या कागदपत्रांमधून हा खुलासा झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे. सीबीय आणि विशेष न्यायालायने या सुटकेला विरोध केला होता. केंद्रीय गृह विभागाने प्रस्तावावर विचार करताना या सर्व दोषींच्या चांगल्या वर्तणुकीची दखल घेतली आणि त्यानंतर त्यांच्या सुटकेला मंजुरी देण्यात आली, असं सोमवारी गुजरात सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आलं. गुजरात सरकारने ११ आरोपींच्या सुटकेसाठी २८ जून २००२ रोजी केंद्राकडे परवानगी मागितली होती. गृह विभागाने ११ जुलैला या प्रस्तावाला मंजुरी दिली असल्याचं प्रतिज्ञापत्रातून समोर येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बिल्किस बानो यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. तसेच त्यावेळी जमावाने ज्या १४ जणांना ठार केले, त्यात बिल्किस यांच्या तीन वर्षांच्या मुलीचाही समावेश होता. गोध्रा दंगलीनंतर दाहोद जिल्ह्यातील लिमखेडा येथे हा गुन्हा घडला होता. या प्रकरणातील ११ दोषींना १८ वर्षांच्या तुरुंगवासानंतर १५ ऑगस्ट २०२२ रोजी गोध्रा उपकारागृहातून मुक्त करण्यात आलं होतं.