कर्नाटकातील राजकीय अस्थिरतेमागे राज्यातील केवळ भाजपाच्या नेत्यांचाच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरील नेते अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांचाही सहभाग आहे. त्यांच्या आदेशांवरच काँग्रेस-जेडीएसचे सरकार अस्थिर करण्याचा डाव आखण्यात आला आहे. हे लोकशाही आणि जनमताच्याविरोधात आहे. त्यांच्याकडून काँग्रेस-जेडीएसच्या आमदारांना पैसा, पद आणि मंत्रीपदाची लालूच दाखवली जात आहे, असा आरोप कर्नाटक काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला आहे.


कर्नाटकातील राजकीय संकटावर भाष्य करताना सिद्धरामय्या म्हणाले, सरकारे अस्थिर करणे ही कायमच भाजपाची खोड राहिली आहे. हे असंविधानिक असून लोकांनी भाजपाचे सरकार बनवण्याचा जनादेश दिलेला नाही. जनतेने आम्हाला सर्वाधिक मत दिली आहेत. काँग्रेस आणि जदयूने मिळून ५७ टक्के मत मिळवली आहेत.


आमदारकीचे राजीनामे देऊन भाजपासोबत हातमिळवणी करणाऱ्या बंडखोर काँग्रेस आमदारांचे पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल सदस्यत्व रद्द करण्यात येणार आहे. विधानसभा अध्यक्षांकडे आम्ही त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करणार आहोत, असे मोठे अस्त्र सिद्धरामय्या यांनी बंडखोर आमदारांवर उगारले आहे.

दरम्यान, अपक्ष आमदार आणि लघुउद्योगमंत्री एच. नागेश आणि केपीजेपीचे एकमेव आमदार आणि मंत्री आर. शंकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन सरकारचा पाठींबा काढून घेतल्यानंतर कर्नाटकातील काँग्रे-जेडीएस सरकारची अवस्था सर्वाधिक खराब झाली आहे. दरम्यान, आता या सर्व बंडखोर आमदारांचे भवितव्य विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर अवलंबून आहे.