Mumbai Woman Harassment Case In Kerala: केरळमधील मुन्नारमध्ये स्थानिक टॅक्सी चालकांकडून छळ झाल्याचा आरोप करणाऱ्या मुंबईतील एका पर्यटक तरुणीचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल झाल्यानंतर दोन टॅक्सीचालकांना अटक करण्यात आली आहे. याचबरोबर दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
जान्हवी नावाच्या या मुंबईकर तरुणीने तिच्या तीन मिनिटांच्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, स्थानिक टॅक्सी युनियनमुळे मुन्नारमध्ये उबर आणि ओला सारख्या राइड-हेलिंग सेवांना परवानगी नाही, असे तिला सांगण्यात आले होते.
“आम्हाला सांगण्यात आले की जर आम्ही उबर किंवा ओलाची सेवा घेतली, तर आम्हाला कॅब चालकांना दुसऱ्या ठिकाणी बोलवावे लागेल. आमचा कॅब ड्रायव्हर आल्यानंतर आम्ही कॅबमध्ये आमच्या बॅगा ठेवत होतो, तेव्हा आमच्या मागे आलेल्या ५-६ व्यक्तींनी आमच्या कॅब ड्रायव्हरला धमकी दिली की, तो आम्हाला घेऊन जाऊ शकत नाही. या घटनेमुळे आम्हाला असुरक्षित वाटले”, असे या मुंबईकर तरुणीने व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
या तरुणीने पुढे सांगितले की, तिने मदतीसाठी पोलिसांना फोन केला, परंतु त्यांनी तिला युनियन ड्रायव्हर्सचीच सेवा वापरण्यास सांगितले.
“आम्ही केरळ पर्यटन विभागाला फोन केला, तर त्यांनीही तेच सांगितले. तुम्ही कोणासोबत प्रवास करायचा हे ठरवण्याची परवानगी तुम्हाला नाही”, असेही ही तरुणी पुढे म्हणाली आहे.
या सर्व प्रकारामुळे संतापलेल्या या मुंबईकर तरुणीने, “हे ठिकाण सुंदर असले तरी, पुन्हा कधीही या राज्यात येणार नाही”, असेही व्हिडिओत स्पष्ट केले आहे.
तरुणीचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुन्नार पोलिसांनी स्वतःहून याची दखल घेत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी व्हिडिओमध्ये दिसणारे विनायकन आणि विजयकुमार या दोन स्थानिक टॅक्सी चालकांना अटक केली आहे.
केरळच्या गृह विभागाने हे प्रकरण समोर आल्यानंतर मुन्नार पोलीस स्थानकाचे सहाय्यक उपनिरीक्षक साजू पौलोस आणि जॉर्ज कुरियन या दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.
केरळचे वाहतूक मंत्री के. बी. गणेश कुमार म्हणाले की, या प्रकरणातील चालकांचे परवाने रद्द केले जातील. “केरळ किंवा भारतात उबरवर बंदी नाही. उबर चालवणारे देखील कामगार आहेत”, असे त्यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे, मुन्नार टुरिस्ट टॅक्सी ड्रायव्हर्स असोसिएशनने हे आरोप फेटाळले आहेत. “आम्ही पर्यटकांना त्रास दिला नाही. हे पर्यटक आमची उपजीविका आहेत. उबर आणि ओला वाहनांना स्टेशन आणि विमानतळांवर प्रवाशांना सोडण्याची परवानगी आहे, परंतु ते स्थानिक ट्रिप घेऊ शकत नाहीत. यावर न्यायालयाचा आदेश आहे,” असे एका प्रतिनिधीने सांगितले.
