अहमदाबादच्या रस्त्यावर शेकडो निरपराध नागरिकांची कत्तल करणे, हेच कणखरपणाचे लक्षण असेल तर मला हा कणखरपणा अमान्य आहे. भारताला नरेंद्र मोदींची अशी ‘कणखरता’ नको आहे. मोदी पंतप्रधान झाल्यास देशावर मोठे संकट कोसळेल, अशा शब्दांत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी हल्ला चढवला. ‘दुबळे पंतप्रधान’  अशी टीका सहन करणाऱ्या मनमोहन सिंग यांनी देश-विदेशातल्या निवडक पत्रकारांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना राजकीय चातुर्याने उत्तरे दिली. विरोधक व प्रसारमाध्यमांनी संगनमताने मला ‘दुबळा’ ठरविले, असा आरोप करीत पंतप्रधानांनी मनातील खदखद व्यक्त केली.
दुहेरी सत्ताकेंद्राचा आरोप फेटाळताना पंतप्रधान म्हणाले की, निर्णय घेताना माझ्यावर कोणताही दबाव नव्हता. उलट काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांची मला मदतच झाली. राहुल गांधी यांच्यात देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. त्यामुळे तेच पंतप्रधानपदासाठी योग्य आहेत.
कार्यकाळ पूर्ण झाल्यावर राजकीय जीवनातून निवृत्त होणार असल्याच्या घोषणेचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. ते म्हणाले की, मोदींचे ‘काँग्रेसमुक्त भारत’ हे निव्वळ स्वप्नच राहील. येत्या लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचाच पंतप्रधान होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आम्ही भ्रष्टाचारी असतो तर २००९ साली आम्हाला जनतेने दुसऱ्यांदा निवडून दिले नसते, असेही ते म्हणाले.
संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारची सलग साडेनऊ वर्षे, आम आदमी पक्षाचा उदय, सहकारी पक्षांशी असलेले संबंध, आघाडी सरकार चालवताना होणारी कसरत, गांधी कुटुंबीयांचा सरकारवरील प्रभाव यांसारख्या अनेक प्रश्नांची पंतप्रधानांनी उत्तरे दिली. काही प्रश्नांचे उत्तर इतिहासच देईल, असे सांगत पंतप्रधानांनी वेळ मारून नेली.
पंतप्रधान म्हणाले की, देशाच्या विकासासाठी मी सदैव काम केले. वाढत्या महागाईला सरकार रोखू शकले नाही. महागाई वाढली हे जितके खरे आहे, तितकेच लोकांचे उत्पन्नदेखील वाढले. रोजगाराच्या फारशा संधी उपलब्ध होऊ शकल्या नाहीत, याची मात्र कबुली त्यांनी दिली.
आम आदमी पक्षाला जनतेने कौल दिला आहे. जनतेचा आदर केलाच पाहिजे, असेही ते म्हणाले. जनरल परवेज मुशर्रफ यांच्या नेतृत्वाचा अस्त झाल्याने पाकिस्तानशी सुरू असलेल्या चर्चेवर विपरीत परिणाम झाल्याचेही पंतप्रधान म्हणाले. साडेनऊ वर्षांच्या कारकिर्दीतील सर्वात आनंदी व दुखद क्षणांविषयी कधीच विचार केला नाही, असे नमूद करीत पंतप्रधानांनी अमेरिकेशी झालेला अणुकरार ही सरकारची सर्वात मोठी देणगी असल्याचे सांगितले.

इतिहास माझी नोंद घेईल
मी कमकुवत पंतप्रधान नाही. विरोधक आणि माध्यमांपेक्षा इतिहासच माझं योग्य मूल्यमापन करील आणि अत्यंत कठीण राजकीय काळात मी योग्य नेतृत्व केलं, याची नोंद घेईल – मनमोहन सिंग</strong>

काँग्रेस नेत्यांकडून राहुलस्तुतीपठण सुरू..
वृत्तसंस्था, नवी दिल्ली : सलग दहा वर्षे नेतृत्वाची धुरा वाहिल्याने आता आगामी निवडणुकीनंतर मी पंतप्रधानपदावर राहणार नाही, असे मनमोहन सिंग यांनी सूचित केल्यापाठोपाठ काँग्रेस नेत्यांनी तसेच फारुक अब्दुल्ला यांच्यासारख्या समर्थकांनी राहुल गांधी यांचा स्तुतीपाठ गायला सुरुवात केली आहे. केंद्रीय मंत्री मनिष तिवारी यांनी सांगितले की, सिंग यांचा वारसा राहुल गांधी हेच सांभाळू शकतील. ते जन्मजात नेते असून लोकांच्या आशीर्वादाच्या बळावर ही जबाबदारी ते योग्य प्रकारे सांभाळतील, असे तिवारी म्हणाले.
अशोभनीय
नरेंद्र मोदी यांच्याबाबत मनमोहन सिंग यांनी वापरलेली भाषा ही पंतप्रधानपदावरील व्यक्तीच्या तोंडी न शोभणारी आहे, अशी टीका राज्यसभेतील विरोधी पक्षनेते व भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनी केली.
देशासाठी नव्हे, काँग्रेससाठी धोका!
मोदी देशासाठी नव्हे तर काँग्रेससाठीच धोकादायक ठरतील आणि त्याचीच धास्ती पंतप्रधानांच्याही मनात आहे, असा टोला छत्तीसगढचे मुख्यमंत्री रमण सिंह यांनी लगावला.
नेटकरांकडून टीकेची झोड
मोदी हे देशासाठी धोकादायक ठरतील, या पंतप्रधानांच्या विधानाचा ट्विटर व फेसबुकवरून नेटकरांनी समाचार घेतला. ‘अधिकृतपणे राजकारणातून निवृत्ती जाहीर केल्याबद्दल आभार. तुम्हीच देशासाठी अधिक धोकादायक ठरला आहात’, असे शेरे आणि त्यावरचे लाइक्सची संख्या वाढती होती.