चलनताप सहन करणाऱ्या देशवासीयांना नववर्ष भेट ; विविध योजनांचा वर्षांव

निश्चलनीकरणाच्या ५० दिवसांत विरोधकांनी केलेला टीकेचा भडिमार आणि वारंवार निर्णयबदलामुळे जनतेमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाच्या पाश्र्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववर्षांच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना नववर्षांची भेट दिली. दिवाळीनंतर सरकारने सुरू केलेल्या ‘स्वच्छता यज्ञा’ला साथ दिल्याबद्दल देशवासीयांचे आभार मानतानाच पंतप्रधानांनी अनेक योजनांची घोषणा करून जनतेला खूष करण्याचा प्रयत्न केला.

Yogi Adityanath up rally
उत्तर प्रदेशात नरेंद्र मोदी आणि योगींच्याच विरोधकांपेक्षा अधिक सभा!
sanjay raut narendra modi
“…त्यांनी मंगळसुत्रांची उठाठेव करू नये”, राऊतांची पंतप्रधानांवर टीका; म्हणाले, “काश्मीरमध्ये मोदीपुरस्कृत दहशतवाद्यांनी…”
dewendra fadanvis
आमचा प्रवक्ताही चर्चेत पाणी पाजेल…; फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना…
Pakistan former Prime Minister Imran Khan
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना दिलासा, १४ वर्षांच्या शिक्षेला इस्लामाबाद उच्च न्यायालयाची स्थगिती

चलनातील मोठय़ा मूल्यांच्या नोटांमुळे काळा पैसा, भ्रष्टाचार, महागाई वाढत होती, असे स्पष्ट करत मोदी यांनी नववर्षांच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना संबोधित करताना निश्वलनीकरणाच्या निर्णयाचे ठाम समर्थन केले. निश्चलनीकरणाच्या ५० दिवसांत स्वत:चे पैसे काढण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागला. यासंदर्भात माझ्याकडे हजारो पत्रेही आली आहेत. अनेकांनी या ‘स्वच्छता यज्ञा’ला पाठिंबा दिला तर काहींनी निश्चनीकरणानंतर आलेले अनुभव कथन केले आहेत. मात्र, ही सर्व पत्रे आपुलकीने मला लिहिल्याचे स्पष्ट करत मोदींनी भ्रष्टाचार, काळा पैशाविरोधातील लढाईत साथ दिल्याबद्दल नागरिकांचे आभार मानले.

नव्या वर्षांत बॅंकांचे कामकाज पूर्वपदावर येईल, अशी आशा मोदींनी या वेळी व्यक्त केली. मात्र, चलनकल्लोळ कधी थांबेल, याबाबत स्पष्ट माहिती देणे त्यांनी टाळले. आपले सरकार सज्जनांचे मित्र असल्याचे सांगत त्यांनी बेईमानांवर कायदेशीर कारवाई होईल, याचा पुनरूच्चारही केला. ‘सबका साथ़, सबका विकास’ हे प्रचारवाक्य उधृत करत मोदी यांनी वंचित, गरीब, शोषित, महिला सक्षमीकरणासाठी सरकार कटिबध्द असल्याची ग्वाही दिली.

घरबांधणी

प्रधानमंत्री आवास योजनेंगर्तत २०१७ मध्ये शहरात घरासाठी ९ लाखांपर्यंतच्या कर्जावर व्याजदारात ४ टक्के तर १२ लाखांपर्यंतच्या कर्जावरील व्याजदरात ३ टक्के सूट देण्यात येईल. गावांमध्ये ३३ टक्के जादा घरे बांधण्यात येतील. गावातील घरबांधणी किंवा राहत्या घराचा विस्तार करायचा असेल तर त्यासाठी दोन लाखांच्या कर्जावरील व्याजदारात ३ टक्क्यांची सूट देण्यात येईल.

कृषीकर्ज

सहकारी बॅंकांकडून कृषीकर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे ६० दिवसांचे व्याज माफ करण्यात येईल. ही रक्कम त्यांच्या बॅंक खात्यात वळती करण्यात येईल. तीन कोटी किसान क्रेडिट कार्ड ही रूपे क्रेडिट कार्डमध्ये रुपांतरित केली जातील.

लघु व मध्यम उद्योग

लघुउद्योगांसाठीची कर्जमर्यादा एक कोटीवरून आता दोन कोटींवर नेण्यात आली आहे. म्हणजेच लघुउद्योगासाठी दोन कोटींचे कर्ज देण्यात येईल. रोकडरहित व्यवहारांना प्रोत्साहन म्हणून व्यापाऱ्यांना सूट.

गर्भवती महिला

गर्भवती महिलांसाठी ६ हजार रूपयांची आर्थिक मदत. ही रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल. माता मृत्यूदर कमी करण्यासाठी पावले उचलणार

ज्येष्ठ नागरिक

ज्येष्ठ नागरिकांच्या साडेसात लाखांच्या दहा वर्षांसाठीच्या मुदत ठेवींवर आठ टक्के व्याजदर देणार.

काळा पैसाधारकांना इशारा

करचुकवेगिरी करून स्वतच्या तुंबडय़ा भरू पाहणाऱ्या काळ्या पैसावाल्यांना मोदींनी पुन्हा एकदा इशारा दिला. देशात केवळ २४ लाख लोकांचे वार्षिक उत्पन्न १० लाखांहून अधिक असल्याची आकडेवारी आहे, मात्र प्रत्यक्षात एकाच शहरात १० लाखांहून अधिक वार्षिक उत्पन्न असलेल्या लोकांची संख्या किमान लाखभर असेल, असे असा अंदाज वर्तवत त्यांनी बेईमानांना वठणीवर आणण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले.

पंतप्रधानांचे भाषण ‘निराशाजनक’ होते. निश्चलनीकरणातून गेल्या ५० दिवसांत किती ‘लाख कोटी’ रुपयांचा काळा पैसा सरकार बाहेर काढू शकले याचा त्यांनी उल्लेखही केला नाही. निश्चलनीकरणामुळे अर्थव्यवस्था पांगळी झाली आहे; पण मोदी यांनी अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत.

– रणदीप सुर्जेवाला, काँग्रेस प्रवक्ते

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववर्षांच्या पूर्वसंध्येला दूरचित्रवाहिनीवरून केलेल्या भाषणात केलेल्या घोषणांच्या माध्यमातून लोकांना नववर्षांची भेट दिली आहे. एका बाजूला पंतप्रधान भ्रष्टाचार व काळ्या पैशाविरुद्ध लढत असून दुसरीकडे त्यातून मिळालेले सर्व उत्पन्न गरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी व तळागाळातील लोकांसाठी खर्च केले जात आहे. मोदीजी, धन्यवाद.

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

निश्चलनीकरणातून एकही काळा पैसा वसूल झाला नाही आणि भ्रष्टाचार अजिबात कमी झाला नाही. या निर्णयाचा त्रास सोसलेल्या लोकांना त्यांनी कुठलाही दिलासा दिला नाही. मोदींचे बोलणे आता पोकळ वाटते.

अरविंद केजरीवाल, दिल्लीचे मुख्यमंत्री

या भाषणात पंतप्रधान काळा पैसा व निश्चलनीकरणाच्या वास्तविक विषयापासून भरकटले. त्यांनी केवळ अर्थमंत्र्यांची भूमिका वठवून अर्थसंकल्पपूर्व भाषण केले.

– ममता बॅनर्जी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री