वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता घेण्यात आलेल्या ‘नीट’ सामाईक प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर देशभर वाद निर्माण झाला आहे. नीट परीक्षेमधील गोंधळामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या परीक्षेतील गोंधळानंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. दरम्यान, नीट पेपर लीक प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. आता नीट परीक्षा पेपरफुटीच्या प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. बिहारच्या पाटणामधून सीबीआयने गुरुवारी दोघांना अटक केली आहे.

नीट परीक्षा पेपरफुटीच्या प्रकरणात पाटणामधून सीबीआयने मनीष प्रकाशला चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. त्यानंतर सीबीआयने मनीष प्रकाशला अटक केली. तसेच या अटकेबाबत मनीष प्रकाशच्या पत्नीला माहिती देण्यात आली. नीट पेपरफुटीच्या प्रकरणात मनीष प्रकाशची महत्वाची भूमिका असल्याचा संशय सीबीआयला आहे. याचं कारण मनीष प्रकाशने पाटणा येथे ४ मे रोजी म्हणजे परीक्षेच्या एक दिवस आधी एका स्कूलशी संबधित वसतिगृहात काही विद्यार्थ्यांना बसवले होते.

हेही वाचा : बिहारमधील महिलांच्या लैंगिक शोषणाच्या केंद्रस्थानी सुरतमधील कंपनी

मनीष प्रकाशने आशुतोष कुमारच्या विनंतीवरून ही व्यवस्था केल्याचा आरोप आहे. त्याच ठिकाणी काही विद्यार्थ्यांना नीट परीक्षेचे लीक झालेले पेपर आणि उत्तर पत्रिका देण्यात आल्याचा संशय असून पेपरफुटीमध्ये मनीष प्रकाशची महत्त्वाची भूमिका असल्याचं मानलं जात आहे. मनीष प्रकाशने ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना बसवलं होतं, त्याच परिसरात सीबीआयला एक अर्धवट जळालेली प्रश्न पत्रिका आढळून आल्याची माहिती आहे. त्यामुळे अर्धवट जळालेली प्रश्नपत्रिका ही या तपासाचा आधार ठरली आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे.

मनीष प्रकाशला अटक केल्यानंतर त्याच्या पत्नीला यासंदर्भातील माहिती देण्यात आली. त्यानंतर मनीष प्रकाशच्या पत्नीने म्हटलं की, “सीबीआयकडून दुपारी दीडच्या सुमारास फोन आला होता. तेव्हा सांगितलं की, माझ्या पतीला अटक करण्यात आली. मात्र, ते एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था करण्यास मदत करतात. मी मनीष प्रकाशला फोनवर बोलताना चार-पाच विद्यार्थ्यांची व्यवस्था करायला सांगताना ऐकलं होतं. पण यामुळे मनीष प्रकाश अडचणीत सापडलेन याची कल्पना नव्हती.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या प्रकरणातील संजीव मुखियाचा हा मुख्य सूत्रधार असल्याचा संशय असून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सीबीआय करत आहे. संजीव मुखिया आणि सिकंदर यादव यांच्या घरांवर सीबीआयने छापे टाकले आहेत. मात्र, संजीव मुखिया हा फरार झाला असून त्याचा तपास सीबीआय करत आहे. तसेच याबाबत सीबीआय या प्रकरणी अनेकांची चौकशी करत आहे.