पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते काँग्रेसमध्ये राहणार नाहीत, असं त्यांनी म्हटलं होतं. तसेच आपण भाजपामध्येही जाणार नसून स्वतःचा पक्ष स्थापन करणार असल्याचं ते म्हणाले होते. यासंदर्भात बुधवारी त्यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. आपला नवा पक्ष भाजपासोबत जागावाटप करेल, परंतु ते अकाली दलासोबत युती करण्यास तयार नाहीत, असं कॅप्टन यांनी स्पष्ट केलंय. तसेच पक्षाचे नाव अद्याप ठरलेले नाही, असेही ते म्हणाले.

“आम्ही चिन्ह आणि नावासाठी निवडणूक आयोगाला विनंती केली आहे. त्यांची मंजुरी मिळाल्यावर कळवू, त्यांना निर्णय घेऊ द्या, असेही कॅप्टन म्हणाले. तसेचे आम्ही राज्यात ११७ जागा लढवू आणि आमच्यासोबत काँग्रेसचे बरेच लोक येत आहेत,” असा दावाही सिंग यांनी केलाय. दरम्यान, ड्रोन हल्ल्यांच्या वाढत्या संख्येमुळे राज्याची सुरक्षा धोक्यात आली आहे, असं कॅप्टन यावेळी म्हणाले. पूर्वी शस्त्रे आणि ड्रग्ज पाठण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात होता, परंतु आता स्फोटके देखील उपकरणांद्वारे पाठवली जात आहे. सीमेवर काहीतरी घडतंय आणि सरकारने त्यावर कारवाई करावी, असे आवाहन सिंग यांनी केले.

दुसरीकडे, सिद्धूंनी अमरिंदर सिंग यांच्यावर निशाणा साधला आहे. “मी लोकांसाठी आवाज उठवत होतो, सत्य बोलत होतो म्हणून तुम्हाला माझ्यासाठी दरवाजे बंद करायचे होते. मागच्या वेळी तुम्ही तुमचा स्वतःचा पक्ष स्थापन केला होता तेव्हा तुम्ही तुमचे मतदार गमावले. तुम्हाला केवळ ८५६ मतं मिळाली होती. पंजाबच्या हिताशी तडजोड केल्याबद्दल पंजाबचे लोक पुन्हा तुम्हाला शिक्षा देण्याची वाट पाहत आहेत,” अशी टीका सिद्धू यांनी केली आहे.

दरम्यान, लुधियाना येथील मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी म्हणाले की, केंद्राने आणलेले तीन वादग्रस्त कृषीविषयक कायदे रद्द करण्यासाठी ८ नोव्हेंबर रोजी विशेष पंजाब विधानसभेचे अधिवेशन बोलावण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.