गुजरातच्या वडोदरामध्ये उघडपणे मांसाहारी पदार्थ विकणाऱ्या रस्त्यावरील फेरीवाल्यांकडून दंड आकारण्यासाठी मोहीम सुरू केली जाणार असल्याची माहिती आहे. वडोदरातील अधिकार्‍यांना खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर मांसाहारी पदार्थांची विक्री होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच अशा स्टॉल्स आणि गाड्यांनी मांस योग्यरित्या झाकले आहे की नाही, याची खात्री करणे आवश्यक आहे. अंडीपासून बनवल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या गाड्यांनाही हे नियम लागू होणार आहेत, अशी माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. यापूर्वी राजकोटच्या महापौरांनी मांसाहारी खाद्यपदार्थांची विक्री करणारे स्टॉल नेमलेल्या हॉकिंग झोनपर्यंत मर्यादित ठेवावेत आणि मुख्य रस्त्यांपासून दूर ठेवावेत, अशा सूचना दिल्या होत्या.

या सूचना वडोदरा महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हितेंद्र पटेल यांनी तोंडी दिल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, पटेल यांच्या सूचना कशा अंमलात आणाव्यात याबद्दल काही संभ्रम असल्याचे दिसून येत आहे. एका स्थानिक माध्यमाशी बोलताना पटेल म्हणाले, “मी सर्व खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सना, विशेषत: मासे, मांस आणि अंडी यांसारख्या मांसाहारी खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत. स्वच्छतेच्या कारणास्तव अन्न योग्यरित्या झाकलेले आहे की नाही याची खात्री करा. तसेच स्टॉल्स रहदारीला अडथळा आणू शकतात त्यामुळे ते मुख्य रस्त्यांवरून देखील काढून टाकले पाहिजे,” असं त्यांनी म्हटलंय.

“मांसाहारी अन्न जवळून जाणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला दिसणार नाही, याची विक्रेत्यांनी खात्री करणं आवश्यक आहे. याचा आपल्या धार्मिक भावनांशी संबंध आहे, मांसाहारी पदार्थ उघडपणे विकण्याची प्रथा वर्षानुवर्षे चालत आली आहे, परंतु आता ती प्रथा बदलण्याची वेळ आली आहे,” असं पटेल म्हणाले.