पंढरपूर : आधी करोनाचे संकट आणि आता एस.टी.च्या संपामुळे वारकरी आणि विठ्ठल यांच्यात थोडा दुरावा निर्माण झाला आहे.  करोनामुळे या आधीच्या काही यात्रा खंडित झाल्या होत्या. पण आता करोना आटोक्यात आल्यामुळे यंदा कार्तिकी यात्रेला सरकारने परवानगी दिली आहे.  मात्र एस.टी.च्या संपामुळे अनेक भाविकांना पंढरपूरला येता आले नाही. दशमीला जवळपास दीड लाख भाविक दाखल झाले आहेत. एकादशीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाली. टाळ मृदंग आणि हरिनामाच्या जयघोषाने पंढरी नगरी दुमदुमून निघाली आहे.

वारकरी संप्रदायात आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री या वारीला महत्त्व आहे. मात्र गेले दीड वर्ष म्हणजेच सहा वारींवर करोनाचे संकट होते. येथील प्रशासनाने येणाऱ्या भाविकांचे आरोग्य, सुरक्षा आणि स्वच्छता यावर भर देत तयारी केली. तर दुसरीकडे व्यापाऱ्यांनी यात्रा भरणार म्हणून जय्यत तयारी केली. रेल्वे प्रशासनाने जादा रेल्वे सोडल्या. चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील ६५ एकर जागेत जवळपास ४६५ राहुटय़ांमधून भाविकांना राहण्याची सोय केली.

पावसाने भाविकांची धांदल

पंढरपुरात संध्याकाळी सातच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. सुरुवातीला पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या. त्यानंतर पावसाचा जोर वाढला. मात्र, यात्रेसाठी आलेल्या भाविकांची यामुळे एकच धांदल उडाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास कार्तिकी यात्रेनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली.