scorecardresearch

“मुंबईहून श्रीनगरला केवळ २० तासांत पोहचता येणार ; २०२४ संपण्याच्या अगोदर भारतातील रस्ते अमेरिकेच्या बरोबरीचे असणार ”

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरींचा संसदेत दावा ; जाणून घ्या आणखी काय दिली आहे माहिती

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी आज(मंगळवार) संसदेत देशभरातील रस्ते प्रकल्पांबाबत माहिती सादर केली. आता मुंबई ते श्रीनगर हे अंतर केवळ २० तासांत पूर्ण करता येणार आहे आणि २०२४ च्या अगोदर भारतातील रस्ते अमेरिकेच्या बरोबरीचे झालेले असतील, असं गडकरींनी यावेळी सांगितलं.

फारुख अब्दुल्ला यांच्या प्रश्नावर उत्तर देताना नितीन गडकरी यांनी रस्ते कामांची यादीच सादर केली. “केवळ जम्मू-काश्मीरसाठी आम्ही ६० हजार कोटींची कामं करत आहोत. जी जोझीला टनल बनत आहे. लडाख आणि लेहपासून श्रीनगरपर्यंत पोहचण्यासाठी किती अडचणी येत होत्या, आता तो झेरमोर बोगदा देखील तयार होत आहे. जोझिला टनलमध्ये सद्यस्थितीस एक हजार लोक उणे आठ डिग्री तापमानात आतमध्ये जाऊन काम करत आहेत. २०२६ मध्ये काम पूर्ण होण्याची तारीख होती परंतु मी त्यांना सांगितलं की २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तर मला वाटतं की, हे एक ऐतिहासिक काम होईल.” असं गडकरी म्हणाले.

श्रीनगर ते जम्मू दरम्यान महामार्ग –

तसेच, “लडाख आणि लेहमध्ये येण्या अगोदर जर आपण शिमलावरून मनालीपर्यंत जातो, तर मनालीमध्ये आपली अटल टनल बनली आहे, पूर्वी साडेतीन तास लागत होते आता केवळ आठ मिनिटांमध्ये पोहचतो. आता तिथून अटल टनलमधून निघाल्यानंतर हिमालयाच्यावरून तिथे इतकं सुंदर आहे की मी ते पूर्णपणे डोळ्यांमध्ये साठवू शकलो नाही. आम्ही चार टनल बनवत आहोत. लडाख, लेहमधून येण्यासाठी रस्ता बनवत आहोत, बराच बनला आहे. लडख, लेहपासून थेट कारगिल, कारगिलहून झेरमोर आणि झेरमोरहून श्रीनगर आणि मग श्रीनगर ते जम्मू दरम्यान आम्ही महामार्ग बनवत आहोत. त्याच पाच टनल बनवत आहोत. बरचसं काम झालं आहे.” अशी माहिती देखील गडकरी यांनी दिली.

याचबरोबर, “आज मला सांगताना आनंद होत आहे की, जेव्हा आपण श्रीनगरहून जम्मूकडे जाऊ, तेव्हा त्याच्या मध्यात कटाराच्या अगोदर आपण जो दिल्ली ते कटार, दिल्ली-अमृतसर-कटरा एक्स्प्रेस हायवेचं काम सुरू झालं आहे. आता काश्मीरची कामं देखील देण्यात आली आहेत आणि मग कटरा-श्रीनगर-अमृतसर मार्गे दिल्लाला येऊ आणि दिल्ली-मुंबई महामार्गाला लागू. मी तुम्हाला हा विश्वास देऊ इच्छितो की लडाख आणि लेहवरून आपण श्रीनगरला आल्यानंतर श्रीनगरहून थेट आपण मुंबईला जाऊ आणि मी हे सांगू इच्छितो की हे वर्ष संपण्या अगोदर माझा प्रयत्न असेल की श्रीनगरहून तुम्ही २० तासांच्या आत मुंबईला पोहचाल, असं काम असेल.” असा विश्वास गडकरी यांनी दिला.

मी भारताल आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी… –

याशिवाय नितीन गडकरी यांनी ”अमेरिका श्रीमंत देश आहे म्हणून अमेरिकेतील रस्ते चांगले नाही. अमेरिकेतील रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत आहे.” अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉन केनडी यांच्या या वाक्याचा दाखला देत सांगितलं की, ”मी भारताल आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी, सुखी, संपन्न, शक्तीशाली भारत बनवण्याचा जो संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे, त्याच्या आधारावर मी या सभागृहाला विश्वास देऊ इच्छितो की २०२४ समाप्त होण्या अगोदर भारतातील रस्ते अमेरिकेच्या बरोबरीचे असतील.” असंही यावेळी बोलून दाखवलं.

६० किलोमीटरच्या अंतरात दोन टोल नसणार –

” ६० किलोमीटर अंतराच्या आतमध्ये दोन टोल येत नाहीत. परंतु काही ठिकाणी सुरू आहेत. मी सभागृहास सांगू इच्छितो की हे चुकीचं काम होत आहे, त्यामुळे तीन महिन्यांच्या आतमध्ये ६० किलोमीटरच्या अंतरात एकच टोलनाका असेल, जर दुसरा एखादा असेल तर तो बंद केला जाईल. आपल्या पैसा पाहिजे हे ठीक आहे परंतु याचा अर्थ असा नाही की लोकांना त्रास दिला जावा. ” अशी देखील माहिती यावेळी गडकरी यांनी दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: One will be able to reach mumbai within 20 hours from srinagar before the end of this year nitin gadkari msr

ताज्या बातम्या