भडकलेल्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा कांदा लवकरच दिलासा देण्याची शक्यता आहे. कांद्याचे उत्पादन घेणाऱ्या दक्षिणेकडील राज्यांमधून नवा कांदा बाजारात येऊ लागल्यामुळे येत्या १५ ते २० दिवसांत कांद्याच्या किमती खाली येतील, अशी माहिती केंद्र सरकारतर्फे शनिवारी देण्यात आली.
कांद्याचे उत्पादन घेणाऱ्या कर्नाटक, आंध्र प्रदेशातील नव्या मोसमातील कांदा बाजारात येऊ लागला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये कांद्याचे वधारलेले भाव खाली येतील, असा विश्वास अन्न आणि ग्राहक  खात्याचे मंत्री के. व्ही. थॉमस यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की, सर्वसाधारणपणे जुलै ते ऑक्टोबर या काळात कांद्याचा काहीसा तुटवडा निर्माण होऊन दर वधारतात, असे स्पष्ट करीत देशातील एकूण उत्पन्नाच्या ६० टक्केकांद्यांचे उत्पादन रबी मोसमात मार्च ते जून या काळात घेतले जाते. तर  खरीप मोसमातील ऑक्टोबर ते डिसेंबर आणि जानेवारी ते मार्च महिन्यातही उर्वरित कांद्याचे उत्पादन घेतले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
कांद्याच्या मागणी आणि पुरवठय़ातील समतोल साधण्यासाठी दरवर्षी राज्य सरकारांशी चर्चा केली जाते. शिवाय कांद्याची साठेबाजी करणाऱ्या गुजरात, आंध्रप्रदेश आणि उत्तर प्रदेश आदी राज्यांतील व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.