पाकिस्तानकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषा(एलओसी) आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रसंधीचे वारंवार होणारे उल्लंघन अद्यापही कायम असले तरी, भारत-पाकिस्तान चर्चेदरमन्यान यावर तोडगा निघेल अशी आशा देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरूवारी व्यक्त केली. तसेच राजनाथ सिंह म्हणाले की, “भारतीय अधिकारी पाकिस्तानच्या अधिकाऱयांशी चर्चा करत आहेत. आज ना उद्या पाकिस्तान नक्की वठणीवर येईल. पाकिस्तान जागेवर येईल अशी आशा आहे.”
बुधवारी पाकिस्तानी सैन्याकडून नववर्षाच्या सुरूवातीलाच भारतीय चौक्यांवर जोरदार गोळीबार करण्यात आला. आंतरराष्ट्रीय सीमेवर भारत आणि पाक सैन्यामध्ये झालेल्या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झाला तर भारताने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे चार जवान ठार झाले. बुधवारी मध्यरात्री देखील पाककडून पुन्हा भारतीय चौक्यांवर गोळीबार करण्यात आला.
दरम्यान, सीमेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे वारंवार सुरू असून सत्तेत येण्याआधी भाजप जणू सत्तेत आल्यावर पाकिस्तानविरुद्ध युद्धच पुकारू अशी भाषा करत होते. मग, सत्तेत आल्यानंतर भाजप सरकारला काय झाले? कुठे गेल्या त्यांच्या घोषणा आणि आश्वासने? पाकिस्तानच्या कुरापती थांबल्या का? असे प्रश्न उपस्थित करत काँग्रेस नेते रशिद अल्वी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.