Parliament Building Event : नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरुन चांगलाच वाद रंगला आहे. विरोधक विरुद्ध सत्ताधारी असा हा सामना आहे. २८ मे रोजी नव्या संसद भवनाचं उद्घाटन होणार आहे. मात्र या सोहळ्यावर काँग्रेस, आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेस, आरजेडी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांसह १९ पक्षांनी बहिष्कार घातला आहे. एक पत्र लिहून त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. अशात राहुल गांधी यांनी याच समारंभाविषयी एक ट्वीट केलं आहे जे चांगलंच चर्चेत आहे.

काय म्हटलं आहे राहुल गांधी यांनी?

“राष्ट्रपतींच्या हस्ते संसदेचं उद्घाटन न करणं आणि त्या सोहळ्याला न बोलवणं हा देशाच्या सर्वोच्च संविधानिक पदाचा अपमान आहे. संसद अहंकाराच्या विटा रचून नाही तर संविधानिक मूल्यांनी निर्मिली जाते” या आशयाचं ट्वीट करत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

२१ मे रोजी राहुल गांधींनी केलं होतं एक ट्वीट

नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाविषयी राहुल गांधी यांनी एक ट्वीट केलं होतं. त्यांनी असं म्हटलं होतं की या भवनाचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं पाहिजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाही. हे ट्वीट राहुल गांधी यांनी २१ मे रोजी केलं होतं. यानंतर हा मुद्दा आणखी पुढे आला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसद भवनाचं उद्घाटन करण्याचा विरोधकांनी विरोध दर्शवला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विरोधी पक्षांनी मिळून एक पत्रही जारी केलं आहे

नव्या संसद भवनाचं उद्घाटन हा देशाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा सोहळा आहे. देशात लोकशाही धोक्यात आहे तरीही आम्ही या नव्या संसद भवन निर्मितीबाबत काही बोललो नाही. आपल्या देशासाठी हा महत्त्वाचा क्षण आहे म्हणून या सोहळ्याला उपस्थित राहणार होतो. मात्र या सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाच निमंत्रण देण्यात आलेलं नाही. नव्या संसदेचं उद्घाटन पंतप्रधान मोदी करणार आहेत. ही बाब म्हणजे आपल्या देशाच्या लोकशाहीवर थेट हल्ला आहे. संसद खिळखिळी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन सोहळ्याला राष्ट्रपतींना न बोलवणं हा लोकशाहीवर केलेला हल्ला आहे. आम्ही त्यामुळेच या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे असं पत्रक विरोधी पक्षांनी जारी केलं आहे.