Parliament Monsoon Session 2025 : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याची घटना आणि त्यानंतर भारतीय सैन्यदलाने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात सध्या संसदेत चर्चा सुरू आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरसंदर्भात चर्चा पार पडत आहे. या चर्चेवेळी सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येत असल्याचं पाहायला मिळत आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना ऑपरेशन सिंदूरवरून आणि भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवरून अनेक सवाल विचारले आहेत.
त्यावर आज (२९ जुलै) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात सविस्तर उत्तर दिलं. तसेच ऑपरेशन सिंदूरबाबतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सविस्तर माहिती संसदेत दिली. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानकडून देण्यात आलेल्या अणुबॉम्बच्या धमक्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाष्य केलं. कोणत्याही अणुबॉम्बच्या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही, हे भारताने पाकिस्तानला दाखवून दिलं, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?
“‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात भारताची बाजू मांडण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. तसेच ज्यांना भारताची बाजू दिसत नाही, त्यांना आरसा दाखवण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. हा विजयोत्सव भारतीय सैन्याचा शौर्याचा आहे. दहशतवाद्यांना मातीत गाडलं त्याचा हा विजयोत्सव आहे. दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या. तसेच भारतात दंगली घडवण्याचा कट होता. मात्र, देशाने हा प्रयत्न हाणून पाडला. मी तेव्हाच सांगितलं होतं की दहशतवाद्यांना आम्ही मातीत मिळवल्याशिवाय राहणार नाही. हे देखील सांगितलं होतं की दहशतवाद्यांच्या आकांना देखील सजा मिळेल. एवढंच नाही तर कल्पनेच्याही पलिकडे सजा मिळेल असंही सांगितलं होतं”, असं मोदींनी म्हटलं.
“२२ एप्रिल रोजी जेव्हा घटना घडली तेव्हा मी विदेश दौऱ्यावर होतो. मात्र, त्यानंतर मी लगेच परतलो आणि एक तातडीची बैठक बोलावली आणि सांगितलं की करारा जवाब देना पड़ेगा. दहशतवाद्यांना मातीत गाडणार हा आमचा राष्ट्रीय संकल्प होता. २२ एप्रिलच्या घटनेनंतर पाकिस्तानलाही वाटलं होतं की भारत नक्कीच प्रत्युत्तर देईल. पाकिस्तानला हे देखील वाटलं होतं की भारत काहीतरी मोठी कारवाई करेल असा अंदाज त्यांना होता. त्यानंतर पाकिस्तानकडून अणुबॉम्बबाबत धमक्या सुरू झाल्या होत्या. त्यानंतर भारताने ६ मे रोजी रात्री ज्या पद्धतीने ठरवलं होतं त्या पद्धतीने कारवाई केली आणि पाकिस्तान काहीही करू शकला नाही. ऑपरेशन सिंदूरमधून २२ मिनिटांत २२ एप्रिलचा बदला घेतला. भारताने अशी शिक्षा दिली की दहशतवाद्यांच्या आकांची झोपच उडाली”, असं मोदींनी म्हटलं.
“ऑपरेशन सिंदूर राबवून २२ मिनिटांत २२ एप्रिलचा बदला घेतला”
“आम्हाला गर्व आहे की दहशतवाद्यांना आम्ही शिक्षा दिली. ती शिक्षा अशी होती की दहशतवाद्यांच्या म्होरक्यांची झोप उडाली आहे. पहलगाम हल्ला झाल्यानंतरच पाकिस्तानला समजलं होतं भारत काहीतरी मोठं पाऊल उचलणार आहे. ६ मे च्या रात्री आम्ही २२ मिनिटात २२ एप्रिलचा बदला आपल्या सैन्य दलांनी घेतला. पहिल्यांदा असं घडलं की पाकिस्तानच्या कानाकोपऱ्यातले दहशतवादी तळ आपण उद्ध्वस्त केले. बहावलपूर, मुरिके हेदेखील आपण जमीनदोस्त केलं. पाकिस्तानच्या अणुशक्तीच्या धमकीला आपण खोटं ठरवून दाखवलं. न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग नाही चालणार आणि त्यापुढे भारत झुकणार नाही हे देखील आम्ही दाखवून दिली. भारताने आपली तांत्रिक ताकद दाखवून दिले. पाकिस्तानच्या छातीवर आपण अचूक प्रहार केले. पाकिस्तानचे हवाई तळ आपण उद्ध्वस्त केले. टेक्नॉलॉजीशी आधारे युद्ध करण्याचे हे दिवस आहेत. ऑपरेशन सिंदूरला यातही यश मिळालं आहे. मागच्या दहा वर्षांत आपण जी तयारी केली आहे ती केली नसती तर आपला टिकाव लागणं कठीण होतं”, असंही मोदी यांनी म्हटलं आहे.