बिहारमधील निवडणूक निकालाने पुन्हा हे निश्चित केलं आहे की, २१ व्या शतकात देशाच्या राजकाराणचा मुख्य आधार केवळ आणि केवळ विकासच असणार आहे. असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. तसेच, देशाचा विकास राज्याचा विकास आज सर्वात मोठी कसोटी आहे व येणाऱ्या काळातही हाच निवडणुकीचा आधार राहणार आहे. जे लोकं हे समजतच नाहीत, त्याचं जागोजागी डिपॉझिट जप्त झालं आहे, असं म्हणत मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

बिहारमधील निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी देशवासियांचे आभार मानले आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाचं भाजपाकडून सेलिब्रेशन करण्यात आलं. दिल्लीमधील कार्यालयात सेलिब्रेशन करण्यासाठी कार्यकर्त्यांना तुफान गर्दी केली होती. यावेळी मोदींनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.

मोदी म्हणाले, ”आपल्याकडे हे देखील अनेकदा म्हटलं जात की, बँक खाते, गॅस कनेक्शन, घर, स्वयंरोजगाराठी सुविधा, चांगले रस्ते, चांगल्या रेल्वे, रेल्वेस्थानकं, उत्कृष्ट विमानतळं, नद्यावर उभारले जात असेलले अत्याधुनिक पूल, इंटरनेट कनेक्टिव्हिटी आदी मुद्दे निवडणुकीत महत्वाचे नसतात. जनता अशा लोकांना वारंवार हे सांगत आहे की, खरे मुद्दे हेच आहेत. देशाचा विकास राज्याचा विकास आज सर्वात मोठी कसोटी आहे व येणाऱ्या काळातही हाच निवडणुकीचा आधार राहणार आहे. जे लोकं हे समजतच नाहीत, यावेळी देखील त्यांची जागा… काय झालं माहिती आहे ना? जागोजागी डिपॉझिट जप्त झालं आहे.”

तसेच, ”आज देश भाजपावर जे प्रेम दाखवत आहे. एनडीएवर जे प्रेम दाखवत आहे. त्याचे सर्वात मोठे कारण हेच आहे की, भाजपाने एनडीएने देशाच्या विकासाला लोकांच्या विकासाला आपले सर्वोतोपरी लक्ष्य बनवले आहे.” असेही मोदींनी सांगितले.

यावेळी भाजपाध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंहदेखील उपस्थित होते. बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं असून १२५ जागांवर विजय मिळाला आहे.