रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन आणि मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांच्यावर भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्याकडून करण्यात आलेल्या टीकेसंदर्भात अखेर सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडले. रघुराम राजन आणि अर्थ मंत्रालयातील अधिकाऱ्यांवर करण्यात आलेली टीका अयोग्य असल्याचे त्यांनी सांगितले. रघुराम राजन यांच्या देशभक्तीविषयी शंका घेण्याचे कारण नसल्याचेही यावेळी मोदींनी स्पष्ट केले. याशिवाय, कोणी स्वत:ला व्यवस्थेपेक्षा मोठे समजत असेल तर ते चुकीचे आहे, असे सांगत मोदींनी सुब्रमण्यम स्वामींना अप्रत्यक्षपणे चपराक लगावली.
गेल्या काही दिवसांत स्वामी यांनी राजन, अर्थमंत्री अरूण जेटली आणि अरविंद सुब्रमण्यम यांच्यावर टीकेची झोड उठविली होती. सूट आणि टायमध्ये भारतीय मंत्री ‘वेटर’ दिसतात, अशा शब्दांत जेटली यांची अप्रत्यक्षपणे खिल्लीही उडवली होती. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींचे आजचे वक्तव्य महत्त्वपूर्ण ठरते. मोदी यांनी ‘टाईम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांना स्वामी यांनी केलेल्या टीकेबद्दल विचारण्यात आले. यावेळी मोदींनी म्हटले की, एखादी व्यक्ती माझ्या पक्षाची आहे किंवा नाही, हे महत्त्वाचे नाही. मात्र, माझ्या मते अशी टीका करणे अयोग्य आहे. प्रसिद्धीच्या हव्यासापायी अशी विधाने करणे देशासाठी कधीच लाभदायी ठरणार नाही. लोकांनी जबाबदारीचे भान ठेवून वागले पाहिजे. कोणी स्वत:ला व्यवस्थेपेक्षा मोठे समजत असेल तर ते चूक आहे, असे मोदींनी म्हटले. नुकत्याच अहलाबाद येथे झालेल्या पक्ष बैठकीत मोदींनी भाजप नेत्यांना बोलण्यात आणि वागण्यात संतुलन व संयम राखण्याचा सल्ला दिला होता. या संदेशाची आठवण करून देताच मोदींनी माझा संदेश खूप स्पष्ट असल्याचे सांगितले. माझ्या मनात त्याविषयी कोणताही गोंधळ नसल्याचे सूचक वक्तव्य मोदींनी यावेळी केले.
राजन यांच्याबरोबरचा माझा काम करण्याचा अनुभव चांगला आहे आणि मी त्यांनी केलेल्या कामाचे कौतूक करतो. त्यांच्या देशभक्तीत कोणतीही उणीव नाही. त्यांचे भारतावर प्रेम आहे. त्यांनी भविष्यात कुठेही काम केले तरी ते भारताच्या हिताचाच विचार करतील. त्यामुळे राजन हे देशाच्या भल्यासाठी काम करत नसल्याचे आणि त्यांच्या देशभक्तीत उणीव असल्याचा आरोप चुकीचा आहे, असे सांगत मोदींनी स्वामींच्या राजन यांच्याविषयीच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. सुब्रमण्यम स्वामी यांनी राजन यांची मानसिकता भारतीय नसल्याचे वक्तव्य केले होते.