नवी दिल्ली : सहलीची ठिकाणे आणि थंड हवेच्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात लोकांची गर्दी होत असून बाजारपेठांमध्येही लोक फिरत आहेत. ते मुखपट्टी व सामाजिक अंतराचे नियम पाळत नसल्याने ती चिंतेची बाब आहे, असे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  म्हटले आहे.

ईशान्येकडील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दूरसंवादाने विचारविनिमय करताना त्यांनी सांगितले की, लसीकरण वेगाने होण्याची गरज आहे, तरच तिसरी लाट थोपवता येईल किंवा त्याची तीव्रता कमी करता येईल.

या बैठकीस आसाम, नागालँड, त्रिपुरा, सिक्कीम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, मिझोराम या राज्यांचे मुख्यमंत्री  तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय उपस्थित होते.

मोदी म्हणाले की, लोकांनी करोना प्रतिबंधाचे नियम पाळण्याची गरज असून त्यात ढिलाई होता कामा नये, तरच तिसरी लाट थोपवता येईल. उद्योगधंदे व पर्यटनावर परिणाम झाला हे खरे आहे पण आज परिस्थिती वेगळी आहे. थंड हवेची ठिकाणे, सहलीच्या ठिकाणी लोकांनी गर्दी करता कामा नये. बाजारपेठांमध्येही विना मुखपट्टी फिरणे चुकीचे आहे. आपण सगळ्यांनी एकत्र काम करून करोनाची तिसरी लाट रोखण्याची गरज आहे. करोनाच्या उपप्रकारांवर लक्ष ठेवण्याची गरज असून तज्ज्ञ लोक त्यावर लक्ष ठेवून आहेत. आता उत्परिवर्तित झालेला डेल्टा प्लस विषाणू कितपत हानिकारक आहे, याचा अभ्यास चालू आहे. अशा परिस्थितीत प्रतिबंधक उपाय व उपचार हाच एक उपाय आहे.

पंतप्रधानांनी सांगितले की, करोनाच्या चाचण्या व उपचारांसाठी पायाभूत सुविधा वाढवण्याची गरज आहे. त्यासाठी २३ हजार कोटींची योजना जाहीर केली आहे. त्यातून ईशान्येकडील प्रत्येक राज्याने मदत घ्यावी. ईशान्येकडील काही जिल्ह्यांत करोनाची स्थिती कठीण आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सतर्क रहावे. विषाणूला रोखण्यासाठी सूक्ष्म पातळीवर उपाययोजना करून त्याचा प्रसार रोखावा व सूक्ष्म प्रतिबंध क्षेत्रे त्यासाठी तयार करावीत. आपण लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज असून देशाच्या अनेक भागांत करोनाचे रुग्ण कमी होत आहेत. पण ईशान्येकडे काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे कारण देशांत रुग्णांची संख्या वाढते – कमी होते, त्यासारखा कल या राज्यांमध्ये दिसत नाही.

दिवसात ३१,४४३ जणांना लागण

दरम्यान, देशात एका दिवसात ३१ हजार ४४३ जणांना करोनाची लागण झाली असून हा गेल्या ११८ दिवसांमधील नीचांक आहे. देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या तीन कोटी नऊ लाख पाच हजार ८१९ वर पोहोचली आहे. तर २०२० जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या चार लाख १० हजार ७८४ वर पोहोचली आहे, असे मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.

उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट झाली असून ती चार लाख ३१ हजार ३१५ वर पोहोचली आहे, हे प्रमाण एकूण बाधितांच्या १.४० टक्के इतके आहे. करोनातून बरे होण्याचे प्रमाण ९७.२८ टक्के इतके आहे. देशात सोमवारी १७ लाख ४० हजार ३२५ चाचण्या करण्यात आल्या त्यामुळे चाचण्यांची एकूण संख्या ४३ कोटी ४० लाख ५८ हजार १३८ वर पोहोचली आहे.

देशात आतापर्यंत करोनातून तीन कोटी ६३ हजार ७२० जण बरे झाले आहेत तर मृत्युदर १.३२ टक्के इतका आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत ३८.१४ कोटी जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. गेल्या २४ तासांत करोनामुळे २०२० जणांचा मृत्यू झाला त्यापैकी १४८१ जण मध्य प्रदेशातील आहेत तर १४६ जण महाराष्ट्रातील आहेत. तर आतापर्यंत चार लाख १० हजार ७८४ जणांचा मृत्यू झाला त्यापैकी एक लाख २६ हजार ०२४ जण महाराष्ट्रातील आहेत, असेही  आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.

लसीकरण कार्यक्रमावर चिदम्बरम यांची टीका

डिसेंबरअखेपर्यंत सर्व प्रौढांचे लसीकरण करण्याचे सरकारचे आश्वासन म्हणजे पोकळ  बाता आहेत, असे सांगून काँग्रेसचे नेते पी. चिदम्बरम यांनी मंगळवारी सरकारच्या करोना लसीकरण कार्यक्रमावर टीका केली.

ओडिशा व दिल्ली या राज्यांमध्ये लशींची टंचाई जाणवत असल्याचे सांगून, राज्यांना लशींचा नियमित आणि विनाअडथळा पुरवठा होण्याची योजना जाहीर करावी, असे आवाहन त्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला केले.

‘लशींची टंचाई ही वस्तुस्थिती आहे. लशींचे उत्पादन वाढवून सांगण्यात येत आहे. डिसेंबर २०२१ पर्यंत संपूर्ण प्रौढ लोकसंख्येचे लसीकरण होईल या पोकळ बाता आहेत’, असे चिदम्बरम म्हणाले. ‘आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया देशाला लसीकरण कार्यक्रमाचे सत्य सांगतील काय?’, असा प्रश्न त्यांनी विचारला.