पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या २०१२च्या गुजरात निवडणुकांमध्ये व २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोलाची भूमिका बजावलेले स्ट्रेटेजिस्ट किंवा नियोजनकार प्रशांत किशोर हे पुन्हा भाजपाच्या गोटात परतत असल्याचे वृत्त आहे. त्यानंतर भाजपाच्या विरोधकांच्या टीममध्ये बिहार व उत्तर प्रदेशमध्ये प्रशांत किशोर दाखल झाले. एका दशकभरात निवडणुकांचं उत्तम नियोजन करणारे अशी त्यांची ओळख तयार झाली. हेच किशोर आता पुन्हा मोदींच्या गोटात जात असल्याचे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने इंडिया टुडेनं दिलं आहे.
पुढच्या वर्षी पुन्हा लोकसभा निवडणुकांचा महासंग्राम होणार असून त्या पार्श्वभूमीवर किशोर हे घरवापसी करण्याची शक्यता आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये आरोग्य क्षेत्रातले तज्ज्ञ अशी ओळख असलेले किशोर राजकारणाच्या नकाशावर आले मोदींसाठी त्यांनी केलेल्या नियोजनामुळे. मोदींचा अत्यंत विश्वासू माणूस अशी त्यांची ओळख बनली. मधल्या काळात त्यांनी आपल्या कौशल्याचा फायदा भाजपाविरोधकांनाही करून दिला.
मात्र, सूत्रांच्या सांगण्यानुसार किशोर यांच्या खुद्द मोदींसमवेत गेल्या काही दिवसांमध्ये दीर्घ बैठका झाल्या असून त्या २०१९च्या रणनितीचा भाग असू शकतात. तसे असेल तर भाजपाचे नियोजनकार म्हणून किशोर यांची घरवापसी निश्चित मानली जात आहे. तरूणांच्या पाठिंब्यावर जास्त भर द्या, तो प्रचाराचा फोकस ठेवा असा सल्ला किशोर यांनी दिल्याचे सांगण्यात येत आहे.
विशेष म्हणजे किशोर यांच्या भाजपा अध्यक्ष अमित शाह य़ांच्यासोबतही काही बैठका झाल्या असून जर त्यांच्यामधले मतभेद संपलेले नसते किंवा त्यांनी ते बाजुला ठेवलेले नसते तर ते एकत्र आलेच नसते असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे शाह व किशोर यांच्यामधली दरी बुजली असून दोघेही पुन्हा २०१९च्या निवडणुकांसाठी एकत्र काम करण्याचे संकेत मिळत आहेत. जर मोदींनी किशोरांच्या पारड्यात वजन टाकलं असेल तर शाहंसह अन्यांना त्याचा विचार करावा लागतो व मतभेद बाजुला ठेवावे लागतात असा हा संदेश असल्याचे काहींचे म्हणणे आहे.
२०१४च्या निवडणुकांनंतर किशोर व शाह यांच्यामध्ये वितुष्ट आलं. किशोर यांना पक्षामध्ये महत्त्वाचं पद हवं होतं, जे नाकारण्यात आलं अशी वदंता आहे. आता मात्र व्यावसायिक स्तरावर किशोर सामील होत असून केवळ २०१९च्या निवडणुकांचाच विचार केला जाईल असं मत काहींनी व्यक्त केलं आहे.
किशोर यांच्या I-PAC या कंपनीनं तरूणांची भरती सुरू केली असून तिचा #NationalAgendaForum हा हॅशटॅग व संबंधित संदेश पुरेसे बोलके आहेत.