पीटीआय, जयपूर

भाजप सत्तेत आली तर राज्यघटना नष्ट करतील हा विरोधकांचा आरोप तथ्यहीन आहे. भाजप राज्यघटनेचा आदर करत आहे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आले तर तेही राज्यघटना रद्द करू शकत नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

देशाची राज्यघटना सरकारसाठी सर्वस्व आहे. देशात आणीबाणी लादून काँग्रेसने राज्यघटना नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता, असे मोदी यांनी सांगितले. सीमावर्ती बाडमेरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक सभेला पंतप्रधान मोदी संबोधित करत होते. भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी घटनादुरुस्तीसाठी पक्षाला दोन तृतीयांश बहुमताची गरज असल्याच्या विधानानंतर ‘नरेंद्र मोदी आणि भाजपचे अंतिम ध्येय बाबासाहेबांची राज्यघटना नष्ट करणे हे आहे,’ असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गेल्या महिन्यात केला होता. भाजपने हेगडे यांच्या वक्तव्याला ‘वैयक्तिक मत’ ठरवून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले होते.

हेही वाचा >>>इस्रायलकडून युद्धात ‘एआय’चा वापर? इस्रायली आणि पॅलेस्टिनी पत्रकारांच्या अहवालात खुलासा

राम मंदिर निवडणुकीचा मुद्दा नाही’

अयोध्येतील राम मंदिर हा भाजपसाठी निवडणुकीचा मुद्दा असल्याचा आरोप करणाऱ्या विरोधी पक्षांवर पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी जोरदार हल्ला चढविला. राम मंदिर हे देशातील नागरिकांसाठी श्रद्धेची बाब आहे. राम मंदिर हा निवडणुकीचा मुद्दा कधीही नव्हता आणि होणारही नाही, असे पंतप्रधान म्हणाले. ‘‘काँग्रेसला राम मंदिराचा तिरस्कार कसा आहे हे तुम्ही पाहिले असेल. मंदिराचा संदर्भ असला तरी काँग्रेस आणि तिची संपूर्ण परिसंस्था ओरडू लागते. ते म्हणतात की राम मंदिर हा भाजपसाठी निवडणुकीचा मुद्दा आहे. तो कधीच निवडणुकीचा मुद्दा नव्हता. आणि तो कधीही निवडणुकीचा मुद्दा होणार नाही,’’ असे पंतप्रधानांनी सांगितले. भाजपचा जन्मही झाला नव्हता, तेव्हापासून राम मंदिर आंदोलन सुरू आहे. राम मंदिर ही ५०० वर्षे जुनी बाब आहे, असे ते म्हणाले.

आण्विक नि:शस्त्रीकरणाबाबत टीका

इंडिया आघाडीतील एका पक्षाने त्यांच्या जाहीरनाम्यात आण्विक नि:शस्त्रीकरणाबाबत लिहिले आहे. भारतासारख्या देशाच्या दोन्ही बाजूंचे शेजारी अण्वस्त्रेयुक्त असताना आपण अण्वस्त्रे नष्ट करण्याचा विचार करावा का, असा सवाल मोदी यांनी केला. इंडिया आघाडी कुणाच्या सूचनेवर काम करत आहे, असे मला काँग्रेसला विचारावेसे वाटत आहे, असे मोदी यांनी सांगितले. इंडिया आघाडी भारताला शक्तिहीन बनवू इच्छिते. काँग्रेसची विचारसरणी विकासविरोधी आहे, अशी टीका मोदी यांनी केली.

हेही वाचा >>>इराण- इस्रायलमध्ये तणाव: दोन्ही देशांतील प्रवास टाळा; भारताचा नागरिकांना सल्ला

गेल्या वर्षी श्रावण महिन्यात लालूप्रसाद यादव यांना भेटायला गेलेल असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांना त्यांनी मटन खाऊ घातले होते. पंतप्रधान यांनी काश्मीरमधील उधमपूर येथे आयोजित प्रचारसभेत हा मुद्दा उचलून धरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दोन्ही नेत्यांची तुलना मुघलांशी केली आहे. मुघलांना राजांना पराभूत करून नव्हे, तर मंदिरांची मोडतोड करून आनंद मिळत असे. या नेत्यांनाही श्रावण महिन्यात अशा चित्रफिती तयार करून देशातील जनतेला चिडवण्याचा आनंद मिळत आहे, अशी टीका पंतप्रधानांनी केली.