वृत्तसंस्था, लॉस एंजेलिस

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लॉस एंजेलिसमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ‘नॅशनल गार्ड’च्या सैनिकांची कुमक तैनात केल्यानंतर तेथील आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. त्यासाठी हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. बेकायदा स्थलांतरितांवर कारवाई करण्यासाठी स्थलांतर विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात हे आंदोलन सुरू आहे.

सोमवारी आंदोलनाचा हा सलग तिसरा दिवस होता. रविवारी परिस्थिती चिघळल्यानंतर ‘नॅशनल गार्ड’च्या सैनिकांना पाचारण करण्यात आले. मात्र, त्यानंतरही ते शमले नाही. अनेक आंदोलकांनी कार पेटवून दिल्या. किमान चार कार या वेळी जाळण्यात आल्या. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधूर, रबरी गोळ्यांचा मारा केला. जमावावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी हवेतही गोळीबार केला. त्यानंतर जमावाने महामार्गावर वाहतूक रोखून धरली. गस्तीवरील अधिकाऱ्यांनी दुपारपर्यंत रस्ता मोकळा केला. रस्त्यावरील काही आंदोलकांनी या वेळी पोलिसांवर दगडफेक केली. स्थलांतर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वाहनांना आंदोलकांनी लक्ष्य केले. या वेळी या अधिकाऱ्यांनी जवळच्या पुलाखाली आणि पुलावर स्वसंरक्षणासाठी धाव घेतली. पोलिसांनी बेकायदा जमाव करणाऱ्यांना अटकेचा इशारा दिल्यानंतर सायंकाळपर्यंत जमाव पांगला होता.

सुरक्षा दलांनी सरकारी इमारती आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्त लावला होता. आंदोलकांपुढे अधिकाऱ्यांची संख्या अगदीच नगण्य होती, असे लॉस एंजेलिस पोलिसांनी सांगितले. या आंदोलनादरम्यान गेल्या आठवडाभरात अनेक जणांना अटक करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘नॅशनल गार्ड’च्या तैनातीला गव्हर्नरचा विरोध होता. मात्र, तो डावलून ट्रम्प यांनी या सैनिकांना तैनात केले आहे. यापूर्वी १९६५मध्ये अध्यक्ष लिंडन जॉन्सन यांच्या काळात अमेरिकेत असे घडले होते. ट्रम्प यांनी दोन हजार नॅशनल गार्डना तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. लॉस एंजेलिसमध्ये हिंसक लोक आहेत आणि त्यांना तसेच सोडता येणार नाही. लष्कराला या ठिकाणी पाचारण करणार का, असे विचारले असता सैनिक कुठेही तैनात होऊ शकतात. मात्र, असे देशात होऊ देणार नाही, असे ट्रम्प म्हणाले.