Rajnath Singh On Pakistan : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. मात्र, त्यानंतर अद्यापही पाकिस्तानकडून भारताविरोधात गरळ ओकण्याचं काम सुरूच आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर आणि पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ हे भारताच्या विरोधात सातत्याने वेगवेगळी वक्तव्य करत आहेत. मात्र, आता भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा ठणकावलं आहे.

भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्ताला मोठा इशारा दिला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर फक्त एक ट्रेलर होता, पाकिस्तानच्या जमिनीचा प्रत्येक इंच भाग आमच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या कक्षेत आहे’, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाचं पुन्हा एकदा कौतुक केलं आहे. “ऑपरेशन सिंदूरने हे सिद्ध केलं की विजय आता आपल्यासाठी मोठी गोष्ट राहिलेली नाही. विजय मिळवणं ही आपली सवय बनली आहे’, असं राजनाथ सिंह यांनी लखनौमधील एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं आहे.

राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला काय इशारा दिला?

“भारताला खात्री आहे की आपले शत्रू आता ब्राह्मोसपासून सुटू शकणार नाहीत. पाकिस्तानी भूभागाचा प्रत्येक इंच आता आपल्या ब्राह्मोसच्या आवाक्यात आहे. ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या क्षमतेची फक्त एक झलक होती. ऑपरेशन सिंदूरमध्ये जे घडलं ते फक्त एक ट्रेलर होता. पण त्या ट्रेलरनेच पाकिस्तानला हे दाखवून दिलं की जर भारत पाकिस्तानला जन्म देऊ शकतो, तर भारत आणखी काय करू शकतो…, याबद्दल मला अधिक सांगण्याची गरज नाही”, असा इशारा राजनाथ सिंह यांनी दिला आहे.

पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे चिथावणीखोर वक्तव्य काय आहेत?

काही दिवसांपूर्वी ख्वाजा आसिफ यांनी एक चिथावणीखोर वक्तव्य केलं होतं. ‘आता युद्ध झालं तर भारत स्वतःच्या लढाऊ विमानांच्या ढिगाऱ्याखाली गाडला जाईल’, असं ख्वाजा आसिफ यांनी म्हटलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा एकदा ख्वाजा आसिफ यांनी एक वादग्रस्त वक्तव्य करत म्हटलं होतं की, ‘औरंगजेबाचा काळ सोडला तर भारत कधीही एकसंध नव्हता.’

त्यानंतर ख्वाजा आसिफ यांनी पुन्हा एकदा भारतासह अफगाणिस्तानला धमकी देण्याचा प्रयत्न केला. एका पाकिस्तानी न्यूज चॅनलच्या मुलाखतीत बोलताना ख्वाजा आसिफ यांनी याबाबत भाष्य केलं की, ‘आमचं सैन्य दोन्ही आघाड्यांवर युद्धासाठी सज्ज आहे’, अशा प्रकारचं वक्तव्य ख्वाजा आसिफ यांनी केलेली आहेत.