scorecardresearch

रामदास आठवलेंचे सूर बदलले, गोमांस खाण्यास केला विरोध

त्यांनीच केलेल्या वक्तव्याच्या एकदम विरूद्ध हे वक्तव्य आहे.

रामदास आठवलेंचे सूर बदलले, गोमांस खाण्यास केला विरोध
Ramdas Athawale: हिंदूंच्या भावना गायीशी जोडलेल्या आहेत, असे म्हणत लोकांनी दुसऱ्या जनावराचे मांस खाण्यात कोणतीच अडचण नसल्याचे ते म्हणाले.

हिंदुंच्या भावना गायीशी जोडलेल्या असल्यामुळे लोकांनी गोमांस खाऊ नये, असे आवाहन केंद्रीय सामाजिक कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. त्यांचे हे वक्तव्य काही दिवसांपूर्वी त्यांनीच केलेल्या वक्तव्याच्या एकदम विरूद्ध आहे. गोमांस खाण्यापासून कोणी कोणाला रोखू शकत नाही. प्रत्येकाला त्याच्या आवडीचे मांस खाण्याचा अधिकार आहे, असे त्यांनी म्हटले होते. आठवले यांनी आपल्या पूर्वीच्या वक्तव्यापासून फारकत घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

गुजरात येथील राजकोट येथे शनिवारी झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. लोकांनी गायीचे मांस खाऊ नये. देशात गोहत्येविरोधात कायदा आहे. हिंदूंच्या भावना गायीशी जोडलेल्या आहेत, असे म्हणत लोकांनी दुसऱ्या जनावराचे मांस खाण्यात कोणतीच अडचण नसल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर गोरक्षणाच्या नावाखाली लोकांना मारहाण करणे, त्यांची हत्या करणे सध्या फॅशन बनली असल्याचा आरोप त्यांनी केला.

आठवले यांनी यापूर्वी गोमांस खाण्याचा सर्वांना अधिकार असल्याचे म्हटले होते. गोरक्षणाच्या नावाखाली भक्षक बनणे योग्य नाही. प्रत्येकाला पोलिसांत जाण्याचा अधिकार आहे. पण कायदा मोडण्याचा अधिकार नाही. अशा लोकांना शिक्षा झालीच पाहिजे, असे त्यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले होते.

परंतु, शनिवारी त्यांचे वक्तव्य आपल्या पूर्वीच्या वक्तव्यापेक्षा अगदी उलट आहे. रामदास आठवले यांच्या रिपाइं पक्षाचा भाजपला पाठिंबा आहे. भाजपचा गोहत्येला विरोध आहे. याचदरम्यान आठवलेंनी याविरोधात वक्तव्य केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. कदाचित भाजपमध्ये आपल्या वक्तव्यामुळे निर्माण झालेली नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आठवले यांनी केल्याचे बोलले जाते.

दरम्यान, शनिवारी त्यांनी गायीच्या नावावर काही लोक देशाची एकता आणि अखंडता भंग करण्याचा प्रयत्न करत असून कोणत्याही व्यक्तीला कायदा हातात घेण्याच अधिकार नसल्याचे म्हटले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-07-2017 at 08:03 IST

संबंधित बातम्या