NHAI Clean Toilet Challenge : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) सुरु केलेल्या एका नव्या उपक्रमाची सध्या मोठी चर्चा सुरू आहे. एनएचएआयने एक नवी स्वच्छता मोहीम सुरू केली असून या मोहिमेच्या अंतर्गत महामार्गावरील टोल प्लाझावर असलेल्या खराब शौचालयांची तक्रार करणाऱ्यांना त्यांच्या FASTag च्या खात्यावर एक हजार रुपयांचा रिचार्ज जमा केला जाणार आहे.

देशभरातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवरील टोल प्लाझावर हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. हा उपक्रम येत्या ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत असणार आहे. या संदर्भातील वृत्त पीटीआयच्या हवाल्याने हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

तक्रार कशी करायची?

राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करत असताना अनेकदा टोल प्लाझा लागतात. यावेळी जर तुम्हाला राष्ट्रीय महामार्गांवरील टोल प्लाझाजवळील खराब शौचालये आढळली तर तुम्ही त्यांची तक्रार NHI अॅपवर करू शकता आणि तुम्ही तुमच्या FASTag वर १ हजार रुपयांचा रिचार्ज मोफत मिळवू शकता.

किती वेळा बक्षीस मिळवू शकतात?

राष्ट्रीय महामार्गांवरील खराब शौचालयांची तक्रार करणाऱ्या प्रत्येक व्हीआरएनला FASTag रिचार्जच्या स्वरूपात १००० रुपयांचं बक्षीस मिळेल. मात्र, या बक्षीसासाठी रोख स्वरूपात दावा करता येणार नाही. हा उपक्रम देशभरातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवर ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत सुरू असणार आहे. तसेच प्रत्येक व्हीआरएन या कालावधीत फक्त एकदाच बक्षीस मिळवू शकतात.

या उपक्रमाच्या अटी काय आहेत?

एनएचएआयच्या अधिकारक्षेत्रात बांधलेली किंवा चालवलेली किंवा देखभालीसाठी घेतलेली शौचालये या मोहिमेत येणार आहेत. एनएचएआयच्या नियंत्रणाखाली नसलेल्या म्हणजे इंधन पंप, ढाबे किंवा इतर सार्वजनिक सुविधांवर असलेली इतर शौचालये या मोहिमेमध्ये येणार नाहीत, असं निवेदनात म्हटलं आहे. तसेच प्रत्येक राष्ट्रीय महामार्गावरील शौचालयाची तक्रार केल्यानंतर दिवसातून फक्त एकदाच बक्षीस मोबदल्यासाठी पात्र असेल, मग त्या ठिकाणी कितीही तक्रारी प्राप्त झाल्या असल्या तरी बक्षीस मोबदल्यासाठी एकदाच ग्राह्य धरलं जाईल.

एकाच दिवशी अनेक तक्रारी प्राप्त झाल्यास काय होईल?

एकाच दिवशी एकाच शौचालयासाठी अनेक तक्रारी प्राप्त झाल्यास ‘राजमार्गयात्रा’ या अॅपद्वारे नोंदवलेली पहिली तक्रार आणि वैध प्रतिमाच बक्षीसासाठी पात्र ठरवली जाईल. तसेच ‘राजमार्गयात्रा’ या अॅपद्वारे कॅप्चर केलेल्या स्पष्ट फोटोला जिओ-टॅग (भौगोलिक स्थान) असेल आणि टाइम-स्टँप केलेल्या प्रतिमांचाच विचार केला जाईल. यासाठी कोणत्याही डुप्लिकेट किंवा पूर्वी नोंदवलेल्या प्रतिमा नाकारल्या जातील, असं वृत्तात म्हटलं आहे.

FASTag वर रिचार्ज कसा मिळवायचा?

राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करताना जर ‘राजमार्गयात्रा’ अॅपच्या माध्यमातून तुम्ही ही तक्रार करू शकता. मात्र, ही तक्रार करताना तुम्ही संबंधित खराब शौचालयाचा फोटो टाकताना त्यासाठी जिओ-टॅग केलेलं बंधनकारक आहे. तसेच तक्रारकर्त्याचे नाव, स्थान, वाहन नोंदणी क्रमांक (VRN) आणि मोबाइल नंबर यासारखे तपशील त्यामध्ये भरावे लागणार आहेत.