पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

महापुराच्या दुर्घटनेनंतर केदारनाथ पूर्ण गौरवाने उभे राहील, असा विश्वास होता. तसा माझा आतला आवाज सांगत होता. हा विश्वास पूर्ण झाल्याचे समाधान असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. केदारनाथची सेवा करण्यापेक्षा पुण्य दुसरे नाही. येथे केलेले कार्य हे ईश्वरी कृपा आहे. याचे श्रेय कोणी घेऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान शुक्रवारी केदारनाथ धाममध्ये होते. त्यांनी येथील विकासकामांचा आढावा घेतला. नंतर मंदिराच्या गर्भगृहात १८ मिनिटे प्रार्थना केली. त्यांनी आदिगुरू शंकराचार्यांच्या १२ फूट उंच आणि ३५ टन वजनाच्या मूर्तीचे अनावरणही केले. यानंतर त्यांनी पुतळ्याजवळ बसून पूजा केली. ही मूर्ती म्हैसूर येथील एका शिल्पकाराने बनवली आहे. आदिगुरू शंकराचार्य समाधीची मूळ मूर्ती २०१३ मध्ये महापुरात वाहून गेली होती. यावेळी मोदींनी ४०० कोटीपेक्षा अधिक रुपयांचे पुनर्बांधणी प्रकल्पांचे उद्घाटन केले.

 आज मी सैनिकांच्या भूमीवर आहे. सणाचा आनंद मी माझ्या सैनिकांसोबत साजरा केला आहे. १३० कोटी देशवासीयांचे आशीर्वाद घेऊन मी त्यांच्याकडे गेलो. गोवर्धन पूजेच्या दिवशी मला केदारनाथ धाम येथे दर्शन-पूजा करण्याचे भाग्य लाभले आहे, असे मोदी म्हणाले. 

फडणवीसांनी घेतले त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंगाचे दर्शन

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही शुक्रवारी त्र्यंबकेश्वर येथे ज्योर्तिलिंगाचे दर्शन घेत केदारनाथ येथील मोदींच्या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी झाले. त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री कपिल पाटील, राज्यमंत्री भारती पवार उपस्थित होत्या. यावेळी फडणवीस म्हणाले की, केदारधाम येथील नैसर्गिक आपदेनंतर पंतप्रधान मोदींनी पुनर्निर्माण करण्याचा निश्चय केला होता. आज केदारधाम पुन्हा उभे असून आदि शंकाराचार्यांचे स्मारकही स्थापित करण्यात आले आहे. या लोकार्पण सोहळ्याचे साक्षीदार होता आले हा अतिशय आनंदाचा क्षण आहे.