राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाषा सेम टु सेम आहे. त्यामुळे राज ठाकरे कोणाच्या स्क्रिप्टनुसार सध्या भाषणं करत आहेत हे आता वेगळं सांगायची गरज नाही असं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं आहे. विनोद तावडे यांनी म्हटलं की, ‘शरद पवार आणि राज ठाकरे यांच्या वेगवेगळ्या जाहीर सभा झाल्या. पण या जाहीर सभांमधील भाषा मात्र एकच आहे. मोदी सरकार, भाजपची वाटचाल हुकुमशाहीकडे चालली आहे हे शरद पवार पण बोलले आणि राज ठाकरे पण नेमके तेच बोलले. तसेच नरेंद्र मोदी हे शहीदांच्या नावावर मतं मागतात हेच वाक्य शरद पवारही बोलले आणि राज ठाकरे यांनीही आपल्या भाषणात हाच उल्लेख केला. त्यामुळे जनतेलाही आता कळले असेल की, राज ठाकरे कोणाच्या स्क्रीप्टनुसार कसे काम करीत आहेत असं विनोद तावडे यांनी सांगितलं.
राज ठाकरे यांनी आपल्या भांडुपमधील सभेत रेल्वे अपघातामधील मोनिका मोरे यांना व्यासपिठावर आणले होते. यासंबंधी बोलताना विनोद तावडे यांनी सांगितलं की, ज्यावेळी त्यांचा अपघात झाला त्यावेळी त्या शिकत होत्या, त्यावेळी काँग्रेसचे सरकार होते. पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी संजय निरुपम यांच्यासोबत केईएम रुग्णालयात मोनिका मोरे यांना भेटायला गेल्या. पण त्यावेळी काँग्रेस सरकारने काहीही केले नाही. पण खासदार किरीट सोमय्या यांनी आर्टीफीशिल ऑर्गनच्या माध्यमातुन मोनिका मोरे यांना सर्व प्रकारची मदत विविध ट्रस्टमार्फत करुन दिली. मात्र काँग्रेसने त्यावेळी काही केले नाही आणि आता उलट राज ठाकरे हाच प्रश्न किरीट सोमय्यांना विचारत आहेत. पण राज ठाकरे यांना काँग्रेसला व राष्ट्रवादी काँग्रेसला का विचारता येत नाही ? जेव्हा आघाडीचे सरकार होत त्यावेळी वर्षभर. मग त्यांना का नाही त्यांनी विचारले ? त्यांना विचारायला तुम्हाला लाज वाटते का असा सवाल विनोद तावडे यांनी यावेळी केला.
अभिनंदनची सुटका जिनिव्हा करारामुळे झाल्याचे शरद पवार म्हणत असतील तर मग कुलभूषण जाधव यांची सुटका जिनिव्हा करारामुळे का नाही झाली. त्यामुळे जर कुलभुषण जाधव यांची सुटका होत नसेल तर अभिनंदन यांची पण झाली नसती. अभिनंदन यांची सुटका होण्यासाठी भारताने विशेष प्रयत्न केले, तसेच विशेष आंतरराष्ट्रीय दबाव हा मोदी सरकारने आणल्यामुळे अभिनंदन यांची सुटका झाली. हे पवार का मान्य करत नाही. कुलभूषण यांच्या सुटकेसाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. पण कुलभूषणला पाकिस्तान फाशी देणार होता ते थांबवून आंतराष्ट्रीय कोर्टात आपण ती बाजू भक्कमपणे लढत आहोत हे मोदी सरकारचं मोठं यश आहे हे शरद पवार यांना दिसत नाही का ? असाही सवाल तावडे यांनी विचारला.