High Court : केरळच्या उच्च न्यायालयात एका सिनेमाच्या नावाला विरोध करणारी याचिका पोहचली आहे. ज्यावर भाष्य करताना जानकी व्हर्सेस केरळ हे नाव का चालणार नाही असा सवाल केरळ उच्च न्यायालयाने विचारला आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार केंद्रीय फिल्म प्रमाणपत्र मंडळाने निर्मात्यांनी चित्रपटाचं हे नाव बदलावं अशी मागणी केली आहे. या सिनेमात अभिनेते आणि मंत्री सुरेश गोपी यांनी अभिनय केला आहे. २७ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र या चित्रपटाच्या नावाला आक्षेप घेणारी याचिका केरळच्या उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. ज्यानंतर केरळ उच्च न्यायालयाने या संदर्भातला सवाल केला आहे.
जानकी व्हर्सेस केरळ या नावावर आक्षेप
केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाने जानकी व्हर्सेस केरळ या नावावर आक्षेप घेतल्यानंतर चित्रपटाच्या निर्मात्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. महत्त्वाची बाब ही आहे की चित्रपटाच्या शीर्षकात बदल करा या सीबीएफसीची मागणी रिवाइजिंग कमिटीनेही केली आहे. या सिनेमाच्या शीर्षकातून जे नाव चित्रपट प्रमाणपत्र मंडळलाला बदलायचं आहे ते जानकी आहे. जानकी हे सीतेचं नाव आहे त्यावरुन हा वाद निर्माण झाला आहे.
न्यायाधीश एन. नागरेश काय म्हणाले?
केरळ उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जस्टिस एन. नागरेश म्हणाले की आजवर असे अनेक चित्रपट आले आहेत. ज्या चित्रपटांच्या शीर्षकांमध्ये देवी-देवतांची नावं होती. मात्र त्यावरुन वाद कधीही निर्माण झाला नाही. असं असताना जानकी हे नाव चित्रपटाच्या शीर्षकात असल्याने वाद निर्माण कसा होऊ शकतो? सीता और गीता हा चित्रपट १९७२ मध्ये प्रदर्शित झाला होता. राम लखन हा चित्रपट १९८९ मध्ये प्रदर्शित झाला होता. या नावांबाबत तर कुणीच आक्षेप घेतला नाही. आता जानकी हे नाव चित्रपटाच्या शीर्षकात आहे मग त्यामध्ये आक्षेप घेण्यासारखं काय आहे? तसंच जानकी नावाबाबत न्यायाधीश म्हणाले या चित्रपटात दाखवलं आहे की तिच्यावर बलात्कार होतो. ती पीडिता आहे, मात्र ती काही बलात्कारी नाही. एखाद्या बलात्कार करणाऱ्या आरोपीच्या पात्राला चित्रपटात राम, कृष्ण, जानकी अशी काही नावं देण्यात असती तर मी ही मागणी समजू शकलो असतो. आपण उलट या चित्रपट निर्मात्यांचे आभार मानले पाहिजेत कारण त्यांनी चित्रपटातल्या पात्राला जानकी हे नाव दिलं. ती अभिनेत्री आहे आणि चित्रपटात न्यायासाठी लढते आहे. असंही न्यायाधीश म्हणाले. Live Law ने हे वृत्त दिलं आहे.
सीबीएफसीने काय युक्तिवाद केला?
सीबीएफसीच्या बाजूनेही न्यायालयात बाजू मांडण्यात आली. चित्रपटाच्या शीर्षकातील जानकी हे नाव हटवलं आणि चित्रपटातील पात्राचं नाव बदललं तर आम्ही चित्रपट प्रदर्शित होण्यासाठीचं प्रमाणपत्र देऊ असं सीबीएफसीने म्हटलं आहे. जानकी व्हर्सेस केरळ या चित्रपटात महिलांचं शोषण, लैंगिक अत्याचार, कठोर भाषा, शिव्या, ड्रग्ज, धूम्रपान आणि दारु संदर्भातले संदर्भ आहेत. या सगळ्या गोष्टी विचारांत घेऊन संशोधन समितीने या चित्रपटाला UA प्रमाणपत्र दिलं जावं अशी शिफारस केली होती. मात्र या चित्रपटाच्या नावाला आक्षेप घेतला गेल्याने हे प्रकरण केरळच्या उच्च न्यायालयात पोहचलं.