Sonam Raghuvanshi राजा रघुवंशी हत्या प्रकरणात मेघालय पोलीस सोनम रघुवंशीला घेऊन शिलाँगला रवाना झाले आहेत. पोलीस आज रात्री उशिरा सोनमला घेऊन शिलाँगला पोहचतील. त्यानंतर सोनम आणि इतर आरोपींसह गुन्हा कसा केला ते त्यांना त्या ठिकाणी नेऊन रिक्रिएट केलं जाणार आहे. आरोपींपैकी विशाल चौहानच्या घरी पोलीस पोहचले तेव्हा त्यांना गुन्हा करताना म्हणजेच राजाची हत्या करताना विशालने जे कपडे परिधान केले होते ते मिळाले.
राजा रघुवंशीच्या शवविच्छेदन अहवालात काय?
राजा रघुवंशीच्या शवविच्छेदन अहवालानुसार त्याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने दोन वार करण्यात आले. खासी हिल्सचे पोलीस अधीक्षक विवेक सैयम यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार राजा रघुवंशीचा मृतदेह जेव्हा दरीतून बाहेर काढण्यात आला तेव्हा त्याच्या डोक्यावर दोन वार झाल्याचं दिसत होतं. इंदिरा गांधी आयुर्विज्ञान संस्था या रुग्णालयात मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं. सोनमला आता गुन्ह्याच्या ठिकाणी नेलं जाणार आहे क्राईम सीन रिक्रेएट केला जाणार आहे अशी माहितीही समोर आली आहे.
राजा रघुवंशीच्या आईने काय म्हटलं आहे?
सोनम माझ्या मुलाची हत्या म्हणजेच राजाची हत्या करेल हे आम्हाला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण आता ज्या गोष्टी समोर येत आहेत त्यावरुन असंच वाटतं आहे तीच या सगळ्यात सामील आहे. राजाच्या फोटोला हार घालण्यात आला आहे. हा फोटो जवळ घेऊन त्याची आई म्हणाली, सोनमला दुसरा मुलगा आवडत होता तर मग तिने राजाशी लग्न करण्यास नकार का दिला नाही? तिने माझ्या मुलाची हत्या का केली? तर राजाच्या वडिलांनी म्हटलं आहे की ज्यांनी माझ्या मुलाला ठार केलं त्यांना फाशी द्या. माझ्या मुलाला तडफडत ठेवलं आणि मारण्यात आलं आहे. यापुढे अशा घटना होऊ नयेत म्हणून सगळ्या आरोपींना फाशी द्या. अशी मागणी राजाच्या वडिलांनी केली आहे.
सोनमच्या आईने काय म्हटलं आहे?
सोनमच्या आईने सोनमवर खोटे आरोप लावण्यात आले आहेत असा दावा केला आहे. माझ्या मुलीला खोट्या आरोपांमध्ये अडकवलं जातं आहे. राजा रघुवंशी बरोबर मेघालयात काय झालं ते मला अद्याप सांगता येणार नाही.
सोनम पोलिसांच्या रडारवर कशी आली?
राजा रघुवंशी पत्नी सोनमला घेऊन शिलाँग या ठिकाणी मधुचंद्राला गेला होता त्याच ठिकाणी त्याची हत्या झाली. राजा इंदूरमध्ये ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतो. या हत्येचा तपास विशेष तपास पथकाकडून केला जातो आहे. दरम्यान बेपत्ता होण्यापूर्वी सोनमने तिच्या सासूला म्हणजेच राजा रघुवंशीच्या आईला फोन केला होता. मी आज उपास केला आहे, पतीच्या आरोग्यासाठी मी उपास करते आहे. जंगलात आम्हाला काही मिळणार नाही, आम्हाला जायचं आहे ती चढाई एकदम सरळ सरळ आहे. त्या ठिकाणी आम्ही मोठा झरा पाहण्यासाठी गेलो होतो असं सोनमने सासूला सांगितलं होतं. या फोनवरुन जेव्हा विशेष तपास पथकाने शोध घेतला तेव्हा त्यांना समजलं की ज्या हॉटेलमध्ये सोनम आणि राजा राहिले होते तिथे ती व्यवस्थित जेवली होती. तिने उपास वगैरे काहीही केला नव्हता. ती खोटं का बोलली असेल? हा प्रश्न पडला आणि पोलिसांच्या रडारवर सोनम आली. ज्यानंतर पोलिसांनी तिचे कॉल रेकॉर्ड तपासले आणि सोनम राज कुशवाह या तिच्या प्रियकराच्या संपर्कात होती हे पोलिसांना समजलं. पोलीस अधीक्षक विवेक सैयाम यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं की हॉटेलवर सोनम जेवण करुन निघाली होती. त्यानंतर आम्ही तिचे कॉल रेकॉर्ड तपासले जेव्हा ती राज कुशवाहाच्या संपर्कात होती हे समजलं. राज कुशवाहा आणि सोनमचा कट असा होता की लुटीच्या उद्देशाने टोळी आली त्यांनी राजाची हत्या केली असं भासवायचं पण सोनम सासूशी आज उपास केला आहे असं खोटं बोलली आणि हा कट आहे हे पोलिसांना लक्षात आलं.