काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची सर्व कागदपत्रे नेहरू मेमोरियल म्युझियमच्या स्वाधीन करतील या शक्यतेने संशोधक आनंदित झाले होते. पण त्यांच्या उत्साहावर पाणी पडले आहे. कारण श्रीमती गांधी यांनी नेहरूंची व्यक्तीगत कागदपत्रे संग्रहालयाकडे देण्यास नकार दिला आहे.
सोनिया गांधी यांनी ही कागदपत्रे दिली तर त्यांच्या कुटुंबातील एकूणच संबंधांवर प्रकाश पडण्याची भीती वाटत असल्यानेच त्यांनी ही कागदपत्रे देण्यास नकार दिला आहे. जी अधिकृत कागदपत्रे आहेत ती उपलब्ध करण्यात आली असून त्यात भाषणे व इतर साहित्याचा समावेश आहे, ती सर्व १९४७ पासून नेहरूंचा १९६४ मध्ये मृत्यू झाला त्या काळातील आहेत. संशोधक व विद्वानांना व्यक्तीगत कागदपत्रे संशोधनासाठी हवी होती कारण त्यामुळे नेहरूंचे व्यक्तिमत्त्व समजून घेण्यातील कमतरता दूर होणार होत्या.
पंतप्रधान कार्यालयाचा नेहरू यांच्या कागदपत्रांवर कुठलाही ताबा नाही, पण सांस्कृतिक मंत्रालयाचा आहे. केवळ कृष्ण मेनन यांच्या विषयीची कागदपत्रे पाहण्यास पंतप्रधान कार्यालयाची परवानगी लागते. मेनन यांची कागदपत्रे इंदिरा गांधी यांच्याकडे होती पण नंतर त्याचा ताबा आता पंतप्रधान कार्यालयाकडे आहे. चरण सिंग, जी.व्ही मावळंकर, आर.एन.काव यांची कागदपत्रे बघण्यासाठी कुटुंबीयांची परवानगी आहे. लेखिका नयनतारा सेहगल या विजयालक्ष्मी पंडित यांच्या कन्या होत्या, यांची कागदपत्रे आता दिली जात नाहीत. निकटचे सहकारी प्यारेलाल यांचीही कागदपत्रे दाखवणे त्यांच्या कुटुंबीयांनी बंद केले आहे.
अनेक विद्वानांच्या कक्षेबाहेर राहणाऱ्या कागदपत्रात नेहरूंनी त्यांचे वडील मोतिलाल, आई स्वरूपराणी व पत्नी कमला नेहरू, कन्या इंदिरा गांधी, बहीण विजयालक्ष्मी पंडित व कृष्णा , पुतण्या चंद्रलेखा, नयनतारा व रिटा यांना लिहिलेली पत्रे आहेत.