दक्षिण कोरियात प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या सेओल या मोठय़ा जहाजाला झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या मंगळवारी १०० च्या वर पोहोचली आहे. या बुडालेल्या जहाजात अडकून पडलेल्ये प्रवासी जिवंत असण्याची शक्यता मावळली असून पाणबुडय़ांच्या साहाय्याने मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे. सध्या हवामानात सुधारणा होत असून समुद्रही शांत आहे. मात्र पाण्याखाली अंधार असल्यामुळे शोधकार्यात अडचणी येत आहेत.
ही आतापर्यंतची मोठी दुर्घटना मानली जात असून आठवडय़ाभरानंतरही बेपत्ता प्रवाशांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरूच आहे. या जहाजावर ४७२ प्रवासी होते. त्यापैकी १०० च्या वर प्रवाशांचा मृत्यू झाला असून २७० प्रवासी अद्याप बेपत्ता आहेत. बेपत्ता प्रवाशांमध्ये मोठय़ा प्रमाणात शाळकरी मुलांचा समावेश असून सर्वाचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.