बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा भाजपा आणि एनडीएशी हातमिळवणी केली आहे. तसंच त्यानंतर रविवारी नितीश कुमार यांनी नवव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यानंतर त्यांच्यावर राजद, सपा आणि इंडिया आघाडीतल्या पक्षांकडून टीका केली जाते आहे. सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आपल्या खास शब्दांमध्ये नितीश कुमार यांच्यावर टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हटलं आहे अखिलेश यादव यांनी?

“लोकसभा निवडणूक हरणार हे भाजपाला स्पष्टपणे दिसतं आहे. त्यामुळेच एक कट रचण्यात आला आणि भावी पंतप्रधान होऊ शकणाऱ्या नेत्याला मुख्यमंत्रीपद देऊन तिथे सीमित करण्यात आलं. भाजपाने बिहारच्या जनतेने दिलेल्या जनमताचा अपमान केला आहे, तसंच बिहारच्या जनतेचाही अपमान केला आहे. या अपमानाचा बदला आम्ही भाजपाला लोकसभा निवडणुकीत पराभवाची धूळ चारुन घेऊ. बिहारच्या प्रत्येक नागरिकाला माझं आवाहन आहे की आता तुमचं प्रत्येक मत हे बिहारच्या सन्मामासाठी द्या आणि अर्थातच भाजपाला हरवण्यासाठी.” या आशयाची पोस्ट अखिलेश यादव यांनी केली आहे.

काय घडलं बिहारमध्ये?

बिहारमध्ये अभूतपूर्व राजकीय उलथापालथ पाहण्यास मिळाली. मुख्यमंत्री नितीश कुमारांनी राजद-काँग्रेससह असलेल्या आघाडीतून बाहेर पडत सरकार पाडले. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन त्यांनी एनडीएसह सत्तास्थापनेचा दावा केला. भाजपाच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांनी स्वीकारलं असून नितीश कुमारांनी रविवारी २८ जानेवारी रोजी नवव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. म्हणजे, मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन पुन्हा त्याच दिवशी मुख्यमंत्री पदाची शपथही घेण्याचा विक्रम नितीश कुमारांनी केला. शपथविधी सोहळा झाल्यानंतर माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी त्यांची थोडक्यात भूमिका स्पष्ट केली.

“मी सुरुवातीपासून एनडीएबरोबर होतो. पण आम्ही आमचे मार्ग बदलले. परंतु, आता पुन्हा एकदा आम्ही एकत्र आलो असून यापुढेही एकत्रच राहणार आहोत”, असं नितीश कुमार म्हणाले. या घडामोडींनंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sp leader akhilesh yadav criticized nitish kumar about his move towards bjp alliance and cm oath scj
First published on: 29-01-2024 at 08:54 IST