नंदुरबार : नरेंद्र मोदी यांच्यामुळे पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा खालावली आहे. त्यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे करणाऱ्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे शौर्य, धाडस आणि दृढनिश्चय हे गुण आत्मसात करावेत, असा सल्ला काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी शनिवारी दिला. तसेच त्यांनी मोदींच्या निवडणूक प्रचार सभांतील भाषणांची संभावना ‘पोकळ चर्चा’ या शब्दांत केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी नंदुरबार येथे जाहीर सभा झाली होती. त्यापाठोपाठ शनिवारी प्रियंका गांधी यांचीही महाविकास आघाडीचे उमेदवार गोवाल पाडवी यांच्यासाठी प्रचारसभा झाली. भाजप आदिवासी संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करीत नसल्याचा आणि केंद्र सरकार आदिवासींचा आवाज दडपत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. संधी मिळेल तिथे भाजप आदिवासी संस्कृती बदलण्याचा प्रयत्न करीत आहे. आदिवासींवर अत्याचार झाले तेव्हा पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने मौन धारण केले, अशी टीका प्रियंका यांनी केली. ‘‘आदिवासींच्या जमिनी बड्या उद्याोगपतींना देण्याचा घाट घातला जात आहे. देशातील एकमेव आदिवासी मुख्यमंत्री असलेले हेमंत सोरेन यांना तुरुंगात टाकण्यात आले आहे. आदिवासी समाजावर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून वेळोवेळी हल्ले केले जात आहेत, असे आरोपही त्यांनी केले. आदिवासी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संसद भवनाचे आणि राममंदिराचे उद्घाटन का केले नाही, असा प्रश्नही प्रियंका गांधी यांनी उपस्थित केला.

हेही वाचा >>>साताऱ्याची ईव्हीएम मशिन ठेवलेल्या गोदामाच्या परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा कोलमडली; शरदचंद्र  पवार गटाची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

‘मोदींचे केवळ पोकळ दावे’

मोदी आदिवासी सन्मानाची भाषा करतात, परंतु, त्यांची भाषणे म्हणजे निव्वळ पोकळ आणि खोट्या गप्पा असतात. निवडणुकीतील व्यासपीठावर ते लहान मुलासारखे रडण्याचे नाटक करतात. गेल्या दहा वर्षांत त्यांनी काय केले, हे सांगण्याची हिंमत मोदींमध्ये नाही. ते सर्वसामान्यांपासून दुरावले आहेत, अशी टीका प्रियंका यांनी केली. देशवासीयांच्या अडचणी समजून घेण्यापेक्षा मोदी त्यांना कसे लक्ष्य करण्यात येते, याची तक्रार करतात.