CJI Sanjiv Khanna Asset: सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी १ एप्रिल रोजी ‘फुल कोर्ट मीटिंग’मध्ये प्रत्येकाची संपत्ती जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सोमवारी ५ मे रोजी रात्री सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर न्यायालयातील सर्व न्यायमूर्तींची संपत्ती जाहीर करण्यात आली आहे. त्यात देशाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्यापासून सर्वोच्च न्यायालयातील ३३ पैकी २१ न्यायमूर्तींच्या संपत्तीची यादी देण्यात आली आहे. त्यानुसार न्यायमूर्तींच्या नावे किती रक्कम व मालमत्ता आहेत, यांची माहिती या यादीत देण्यात आली आहे.
सरन्यायाधीश संजीव खन्ना यांची संपत्ती किती?
सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्यानावे बँकेत ५५ लाख ७५ हजार रुपयांचं फिक्स्ड डिपॉझिट आणि १ कोटी ६ लाख रुपयांचा पीपीएफ आहे. याशिवाय, सरन्यायाधीश खन्ना यांच्यानावे दक्षिण दिल्लीत २ बीएचके डीडीए फ्लॅट असून कॉमनवेल्थ गेम्स व्हिलेजमध्ये ४ बीएचके फ्लॅटदेखील आहे. त्याव्यतिरिक्त गुरगावमध्ये त्यांच्या मुलीसह संयुक्त मालकी असलेल्या फ्लॅटमध्ये त्यांच्यानावे ५६ टक्के हिस्सा आहे. हिमाचल प्रदेशमध्ये फाळणीपूर्वीपासूनची त्यांची पिढीजात जमीनदेखील त्यांच्यानावे आहे.
भावी सरन्यायाधीशांची संपत्ती किती?
या यादीमध्ये येत्या काही दिवसांत म्हणजेच १४ मे रोजी सरन्यायाधीशपदाचा कार्यभार स्वीकारणारे न्यायमूर्ती बी. आर. गवई यांच्या संपत्तीचीही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, भावी सरन्यायाधीशांच्या नावे बँकेत १९ लाख ६३ हजारांच्या ठेवी तर पीपीएफ खात्यात ६ लाख ५९ हजार रुपये आहेत. याशिवाय अमरावतीमध्ये पिढीजात घर, मुंबई आणि दिल्लीत फ्लॅट अशा मालमत्तेचा त्यांनी उल्लेख केला आहे. त्याशिवाय, अमरावती आणि नागपूरमध्ये त्यांची पिढीजात शेतजमीनही आहे. तसेच, तब्बल १ कोटी ३० लाखांचं कर्ज त्यांच्या नावावर आहे.
याव्यतिरिक्त २४ मे रोजी निवृत्त होणारे न्यायमूर्ती ए. एस. ओक यांच्या नावे ९२ लाख ३५ हजार पीपीएफ, २१ लाख ७६ हजार एफडी, एक २०२२ चं मॉडेल असलेली मारूती बलेनो कार आणि ५ लाख १० हजारांचं कार लोन आहे.
न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी आपल्या नावावर नोएडामध्ये २ बीएचके फ्लॅट, अलाहाबादमध्ये एक बंगला आणि उत्तर प्रदेशमध्ये पिढीजात शेतजमीन असल्याचं नमूद केलं आहे. तसेच, दीड कोटींची गुंतवणूकदेखील आहे.
न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावावर चंदीगढ, गुरग्राम आणि दिल्लीत पत्नीसह संयुक्त मालकी असलेल्या मालमत्ता आहेत. तसेच, एफडीमध्ये ६ कोटी ३ लाख रुपये आहेत.
न्यायमूर्ती बेला एम. त्रिवेदी यांच्यानावे अहमदाबादमध्ये दोन घरं आहेत. शिवाय, म्युच्युअल फंडमध्ये ६० लाख रुपये, पीपीएफमध्ये २० लाख रुपये, ५० लाखांचे दागिने आणि २०१५ ची मारुती स्विफ्ट कार आहे. न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्याकडे २००८ चं मॉडेल असलेली मारुती झेन एस्टिलो कार आहे. त्याव्यतिरिक्तची सर्व संपत्ती ही आपण न्यायाधीश बनण्याआधीची असून त्यात कोणतीही भर पडलेली नाही, असं त्यांनी नमूद केलं आहे.
स्टॉक मार्केटमध्ये मोठी गुंतवणूक
न्यायमूर्ती संजय कुमार यांनी शेअर बाजारात केलेल्या गुंतवणुकीची माहिती दिली आहे. त्यात भारत पेट्रोलियम, भारती एअरटेल, चोलामंडलम फायनान्स, एचसीएल इन्फोसिस, एचसीएल टेक्नोलॉजीज, एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स कंपनी, इन्फोसिस लिमिटेड, आयटीसी, एनएमडीसी, ओलेक्ट्रा ग्रीनटेक, रिलायन्स इंडस्ट्रीज, सोलरा अॅक्टिव्ह फार्मा सायन्स, स्टेट बँक ऑफ इंडिया, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, टाटा कम्युनिकेशन्स, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा मोटर्स, टाटा सीट्ल, वेदांता लिमिटेड, जिओ फायनान्स, विजया डायग्नोस्टिक सेंटर, आयटीसी हॉटेल्स आणि एनएमडीसी स्टील या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश आहे.
१२० कोटींची गुंतवणूक, ९१ कोटींचा कर!
याशिवाय न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन मे २०२३ मध्ये सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून रुजू झाले. त्यांच्यानावे १२०.९६ कोटींची गुंतवणूक असून त्यांनी २०१०-११ ते २०२४-२५ या काळात तब्बल ९१ कोटी ४७ लाख रुपये कर भरल्याची नोंद आहे!